आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना पॅटर्न आदर्श - सुधीर ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/बदनापूर - ग्रामीण भागातील लोकाना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, दस्तऐवज गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी संपूर्ण राज्यात ग्रामसेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून भ्रष्टाचार व प्रशासनातील अपारदर्शकतेविरुद्ध आपल्याला संघर्ष करावयाचा आहे आणि हाच संगणकीकृत ग्रामपंचायत उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मत व्यक्त करत जालना जिल्ह्यात ग्रामसेवा केंद्र सुरू झाले, ही एक आदर्श बाब असल्याचे मत ग्रामविकास व
पंचायत विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले.
जि.प.च्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित विभागीय कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ग्रामसेवा केंद, पाणंद रस्ते व सिंचन विहिरींच्या पाहणी दौ-यानिमित्त ते जालन्यात आले होते. या वेळी ते म्हणाले, संपूर्ण राज्यात ग्रामसेवा केंद्र सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, यात जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी, विजेची समस्या असतानाही यात यश मिळवलं, हे निश्चितच वाखणण्याजोगं आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील 27 हजार ग्रामपंचायती पूर्णत: आॅनलाइन करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलणारा हा उपक्रम आहे. जालना जिल्ह्यासारखं काम मराठवाड्यात अन् संपूर्ण राज्यात व्हायला हवे. 29 फेब्रुवारी 2012 पूर्वी सर्व ग्रामसेवा केंद्रे सुरू व्हावीत, ग्रामपंचायत पातळीवर होणारे कामकाज, बैठका, खर्चाच्या नोंदी आॅनलाइन करण्यात याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, महिला व बालकल्याण सभापती बी. टी. कदम, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी किरणकुमार धोत्रे, संग्रामचे जिल्हा समन्वयक प्रशांत दासूद आदींची उपस्थिती होती.
संग्राम कक्षाचे उद्घाटन - जि.प. तील संग्राम कक्षाचे उद्घाटन प्रधान सचिव सुधीर ठाकरे यांनी केले. या वेळी त्यांनी संगणक आॅनलाइन करण्यासंदर्भातील अडचणी समजून घेत 2 जीबी कनेक्टिव्हिटी घेण्याची सूचना केली. यामुळे सर्वच कामकाज गतिमान होईल.
जि.प.ची पुनर्रचना होईल - जिल्हा परिषद बरखास्त नव्हे, पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आलेला असून केंद्र सरकारच यावर निर्णय घेईल. देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक राज्यांनी याला सहमती दिल्यावरच अंतिम निर्णय होणार आहे.
बदनापूर तालुक्यातील चार गावांना भेटी - बदनापूर तालुक्यातील वरुडी काकडे वस्ती, कडेगाव, गेवराई बाजार, मात्रेवाडी येथील पाणंद रस्ते, ग्रामसेवा केंद्र, उपकेंद्रास भेटी देऊन सुधीर ठाकरे यांनी पाहणी केली. कडेगाव येथे ग्रामसेवा केंद्राचे उद्घाटन करून संगणकीकृत सातबारा शेतकरी अनिल निंबाळकर यांना दिला. लोकसहभागातून पाणंद रस्त्यांचे काम शेतक-यांनी स्वत:हून हाती घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केली. शासनाकडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जातो, याचा पुरेपूर फायदा घ्यावा असेही ते म्हणाले. तसेच जालना तालुक्यातील गोंदेगाव येथेही ग्रामसेवा केंद्र व पाणंद रस्त्यांची पाहणी करण्यात आली.