आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Cane Production Loss In Marathwada News In Marathi

हंगाम, अपुर्‍या पावसामुळे उत्पादन घटणार; २३ कारखान्यांतून साडेसहा लाख मेट्रिक टन उस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- ऊसदराचा तिढा अद्याप सुटला नसला तरी मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांत ऊस गाळपाने वेग घेतला आहे. ४६ पैकी २३ साखर कारखाने सुरू झाले असून आतापर्यंत ६ लाख, ५९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. दरम्यान, उत्पादनाच्या अंदाजानुसार यावर्षी १६० दिवसांचा गाळप हंगाम निश्चित केला अाहे. नांदेड विभागाअंतर्गत लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांत १ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप होऊ शकते.

ऊसदरासंदर्भात ऊस नियामक मंडळाची स्थापना सरकारने केली आहे. शुक्रवारी या संघटनेची मुंबईत बैठक झाली. मात्र, या बैठकीत ऊसदराचा प्रश्न सुटला नाही. राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्या दोन्ही संघटनेमध्ये ऊसदरावरून मतभेद चव्हाट्यावर आले. काही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे नियामक मंडळ कोणता निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी अनेक कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. यावर्षी लांबलेला हंगाम आणि उसाची अपेक्षित न झालेली वाढ, यामुळे १६० दिवस हंगाम चालण्याची शक्यता नाही. मराठवाड्यात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन घटत आहे. यावर्षी १ लाख ५८ हजार हेक्टर ऊस असून १ कोटी मेट्रिक टन गाळप होण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७० ते ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊ शकते, असे शेतीतज्ज्ञ सांगतात. आगामी काळात टंचाईची विदारकता वाढल्यास गाळपाऐवजी ऊस जनावरांसाठी उपयोगात आणला जाण्याची शक्यता आहे.