आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उतार्‍यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कारखाने अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - नांदेड विभागातील साखर कारखान्यांच्या गाळपाचा निकाल नुकताच हाती आला असून त्यामध्ये सर्वाधिक उतारा टक्केवारी वसमत येथील पूर्णा साखर कारखान्याने देऊन विभागात अव्वल स्थान मिळवले असून इतर दोन कारखान्यांनीही चकमदार कामगिरी करून सरासरी 11.65 टक्केचा उतारा दिला आहे, तर परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी सर्वात कमी म्हणजे केवळ 9.82 टक्के उतारा देऊन खालून पहिला क्रमांक मिळवला.

नांदेड येथील विभागीय सहसंचालक (साखर) कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तिन्ही कारखान्यांनी या वर्षीही चांगली कामगिरी बजावली असून हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. गाळपासाठी वापरलेला ऊस आणि त्यातून मिळालेली साखर यांच्या प्रमाणावरून साखरेचा उतारा काढला जातो. नांदेड विभागात परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांमध्ये 30 एप्रिल रोजी संपलेल्या हंगामात एकूण 82 लाख 77 हजार 638 मेट्रिक टन एवढ्या उसाचे गाळप झाले आहे, तर या गाळपातून 87 लाख 53 हजार 186 क्विटंल साखर मिळाली आहे. हे प्रमाण 10.57 टक्के एवढे आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात भाऊराव चव्हाण युनिट-2 (डोंगरकडा), पूर्णा साखर कारखाना युनिट- 1 (वसमत) आणि पूर्णा युनिट-2 (जवळाबाजार) हे तीन कारखाने आहेत. या तिन्ही कारखान्यांनी 11 टक्क्याच्या वर उतारा दिला आहे. पूर्णाच्या युनिट- 1 ने सर्वात जास्त म्हणजे 11.86 टक्के उतारा दिला आहे. त्यानंतर भाऊराव चव्हाण युनिट- 2 ने 11.84 आणि पूर्णाच्या युनिट- 2 ने 11.09 टक्केचा उतारा दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखान्याने विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 7.70 टक्केचा साखर उतारा देत खालून पहिला क्रमांक पटकाविला आहे, तर केवळ आठ कारखान्यांनी 11 किंवा त्यापेक्षा जास्त उतारा दिला आहे. त्यामध्ये हिंगोलीतील तीन कारखान्यांसह नांदेडमधील भाऊराव चव्हाणचे युनिट 1 आणि युनिट 4, उस्मानाबादमधील पन्नगेश्वर आणि श्री साईबाबा कारखान्यांचा समावेश आहे.

उतार्‍यावर परिणाम करणार्‍या बाबी :
कारखान्याची यंत्रसामग्री किती कार्यक्षम आहे, शेतातून काढलेला ऊस किती वेळात गाळपासाठी वापरला जातो, कारखान्यातील कुशल कामगारांची संख्या आणि पुरेसे कामगार आहेत की नाही आणि त्यांच्या समस्यांचे वेळेवर निराकरण झाले की नाही, या बाबींवर साखरेचा उतारा अवलंबून असतो.

कारखाना व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची
‘साखरेचा उतारा ही बाब काही अंशी उसातील साखरेचे प्रमाण यावर अवलंबून असली तरी सर्वात महत्त्वाची भूमिका कारखान्याचे व्यवस्थापन बजावत असते. शेतातून निघालेला ऊस कमीत कमी वेळात कारखान्यात आला आणि कारखान्यातील कुशल कामगारांनी पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडली तर उतारा निश्चितच जास्त मिळतो. हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांचे व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यानेच पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीचा उतारा मिळत आहे.’
- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक.