आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखानदारीसह रोजंदारी धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - या वर्षी जिल्ह्यात 79 टक्केच पाऊस झाला असल्याने लहान-मोठ्या तलावांसह येलदरी, सिद्धेश्वर व पैनगंगा या धरणांची पातळी खालावली आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारी संकटात सापडली असून जिल्ह्यात 2 हजार 900 हेक्टरवरील उसाची लागवड थांबल्याने पुढील वर्षी तीनपैकी एक कारखाना बंद ठेवावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम केवळ कारखानदारीसह मजुरांवरही होणार आहे.

वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे वसमत येथे युनिट-1 व औंढा नागनाथ येथील बाराशिव येथे युनिट क्र-2 आहे. याशिवाय, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने युनिट क्र. 2 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे, तर वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे काम पूर्ण झाले असून कारखाना गाळपासाठी तयार आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 9 हजार 900 हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र यात घट होऊन ती 7 हजार 100 हेक्टरवर आली आहे.

घट होण्यामागच्या कारणांपैकी 2011 मध्ये बाराशिव कारखाना बंद होता हे एक कारण आहे. यावर्षीपासून बाराशिव (पूर्णा युनिट-2) सुरू झाला. परंतु पाऊसच नसल्याने हा कारखाना संकटात सापडला आहे. पूर्णाच्या युनिट- 1 ची गाळप क्षमता प्रतिदिन 2500 टन, युनिट दोनची 2500 टन तर भाऊरावच्या युनिट-2 ची क्षमता 1200 मेट्रिक टन एवढी आहे. या कारखान्यांना हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 8 हजार हेक्टर तर नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रातील साधरणत: 2 हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस मिळतो, परंतु पावसाअभावी विशेषत: औंढा नागनाथ व कळमनुरी या दोन तालुक्यांमध्ये ऊस लागवडीत मोठी घट झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणा-या नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांतील क्षेत्रातही घट झाली असून सर्व मिळून 2 हजार 900 हेक्टरवरील ऊस लागवड झाली नाही.

770 मजुरांना झळ बसणार
साखर कारखानदारीमुळे हंगामाच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत पूर्णा युनिट क्र.- 1 कायमस्वरूपी 392 तर हंगामी 314 अशा 706 मजुरांना रोजगार मिळवून देते. युनिट क्र- 2 मध्ये हंगामी आणि कायमस्वरूपी अशा 520 तर भाऊरावच्या युनिट क्र- 2 मध्ये कायमस्वरूपी 220 आणि हंगामी 160 अशा एकूण 380 मजुरांना रोजगार मिळतो. पुढील वर्षी ही कारखानदारी संकटात येणार असल्याने सुमारे 770 मजुरांना रोजगार गमवावा लागणार आहे.