आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Industry Lose Three Hundred Coror Rupess In Beed District

बीड जिल्ह्यात साखर कारखानदारीला तीनशे कोटींचा फटका बसणार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दुष्काळाचे चटके सोसणा-या बीड जिल्ह्यात यंदा आठपैकी केवळ पाच साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले. या पाचमध्येही पंचवीस लाख टन ऊस गाळपाची क्षमता असतानाही जेमतेम पंधरा लाख टन उसाचे गाळप कसेबसे होऊ शकेल. यातून स्पिरिट तसेच इथेनॉल उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखानदारीत सुमारे तीनशे कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे.

बीड जिल्ह्यात वैद्यनाथ, माजलगाव, जयभवानी, गजानन, अंबासाखर आणि कडा हे सहकारी तत्त्वावरील तर जयमहेश हा खासगी तत्त्वावरील साखर कारखाना आहे. यंदा उसाची कमतरता लक्षात घेता जयभवानी, कडा आणि अंबासाखर हे तीन कारखाने सुरूच झाले नाहीत. सुरू असलेल्या पाच साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन 13250 एवढी आहे. पंधरा जानेवारीपर्यंत पाच साखर कारखान्यांचे गाळप अकरा लाख तेरा हजार 321 टन एवढे झ्राले आहे. यातून अकरा लाख पाच हजार 285 साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. सुरू असलेल्या कारखान्यांचाच विचार केला तरी दरवर्षी साधारणत: या कारखान्यांचे पंचवीस लाख टन उसाचे गाळप होते.

उसाला दोन हजार रुपयांचा भाव जरी धरला तरी यातून सुमारे पाचशे कोटींची उलाढाल होते. यंदा जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे चित्र निसर्गाच्या लहरीपणामुळे एकदम बदलले आहे. साखर उत्पादनाबरोबरच या साखर कारखान्यांमधून स्पिरिट, इथेनॉल निर्मिती चांगली होते. या निर्मितीतही घट येणार आहे. त्यातून सुमारे शंभर कोटी रुपयांची झळ सहन करावी लागणार आहे.

ऑक्टोबर 2011 मध्ये सुरू झालेले साखर कारखाने फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच चालू शकतील. त्यामुळे साखर कारखान्यातील कामगार, कर्मचा-या ंसोबतच ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजुरांना दुष्काळाचा फटका बसणार आहे. सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी दुष्काळात पुढील चित्र ओळखून ऊस टिकवून ठेवण्यासाठी शेतक-यांना कर्ज, उभे-आडवे बोअर घेण्यासाठी तसेच विहिरीसाठीही अनुदान देण्याला सुरुवात केली आहे.
दूरदर्शी विचाराने कामे करावीत
यंदाच्या भयावह परिस्थितीचा पुढच्या वर्षी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाचपैकी दोन वा तीनच साखर कारखाने सुरू होऊ शकतील. त्यामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावी लागतील. मलमपट्टीची नव्हे, तर दूरगामी विचार करून ही कामे करावी लागतील, असे नॅचरल शुगर कारखान्याचे मालक बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.