आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाने एका वर्षात जिरवले साडेचौदा वर्षांचे पाणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी 40 हजार हेक्टर उसाला प्रवाही पद्धतीनुसार सुमारे 88 कोटी घनमीटर पाणी दिले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 16.60 लाख असून, सरासरी 100 लिटरप्रमाणे रोज 16 कोटी 60 लाख लिटर पाणी होते. उसाच्या पाण्यावर जिल्ह्याची सुमारे 5, 301 दिवसांची (14 वर्षे 6 महिने) तहान भागली असती. पाण्याची अशी उधळपट्टी करणारा हा दुष्काळग्रस्त जिल्हा सध्या घागरभर पाण्याला मोताद आहे.

पावसाचे अत्यल्प प्रमाण, सिंचनाची अपूर्ण कामे, खडकाळ भूभाग, असंतुलित पर्यावरण, अशी कारणे दुष्काळामागे सांगितली जात असली तरी उपलब्ध पाण्याचा वापर कसा, किती प्रमाणात होतो, याचा विचार होत नाही. जिल्ह्याचे पावसाचे सरासरी प्रमाण 766.5 मिलिमीटर आहे. 2011-12 मध्ये 387.4 म्हणजे सरासरीच्या 50.5 मी.मी. इतका कमी पाऊस झाला. जिल्ह्याचे उसाचे 40 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. 20 वर्षांमध्ये ही वाढ झाली आहे. 2012-13 मध्ये जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवर ऊस होता. जिल्ह्यात 10 साखर कारखाने सुरू झाले होते. लातूर, सोलापूर जिल्ह्यांतही उसाचे गाळप मोठय़ा प्रमाणावर झाले. कितीही जनजागृती सुरू असली तरी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर तुलनेने झालेला नाही. 2012-13 मध्ये 49 पैकी केवळ 5 हजार हेक्टरवर सूक्ष्मसिंचन पद्धतीने उसाला पाणी देण्यात आले. म्हणजे 40 हजार हेक्टरपेक्षा अधिक उसाला प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी देण्यात आले.

कृषी विभागाच्या सूत्रांनुसार, प्रचलित पद्धतीपेक्षा सूक्ष्मसिंचन पद्धतीने उसाला पाणी दिल्यास 70 टक्के पाण्याची बचत होते. मात्र, या पद्धतीचा वापर करण्यासाठी शासनाने 100 टक्के अनुदान देण्याची गरज आहे. प्रचलित पद्धतीने उसाला 2 कोटी 20 लाख लिटर पाण्याचा वापर होतो. या वापराप्रमाणे 40 हजार हेक्टर उसासाठी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी 88 कोटी घनमीटर पाण्याचा वापर केला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सरासरी 100 लिटर पाणी दिल्यास 16 लाख 60 हजार लोकसंख्येच्या जिल्ह्याला दररोज 16 कोटी 60 लाख लिटर पाणी पुरेसे आहे. अंकशास्त्रानुसार 88 कोटी घनमीटर पाणी साडेसोळा लाख लोकसंख्येसाठी 5 हजार 301 दिवस म्हणजे 14 वर्षे 6 महिने 2 दिवस एवढे दिवस पुरले असते.

निर्बंध घालावेत
ऊस हे बेटावरचे पीक आहे. त्यामुळे त्याला पाणी जास्त लागते. उस्मानाबाद जिल्हा खडकाळ आहे. दोन्ही विरुद्ध गोष्टी जुळवून आणल्या असल्या तरी त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे किती नुकसान होत आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. उसाचे पीक घ्यायचे झाल्यास सूक्ष्मसिंचन पद्धत बंधनकारक करण्यात यावी. - अँड. नेताजी गरड, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणीत)