आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची ७५ मुले शिक्षणासाठी पुण्याला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कर्जाच्या ओझ्याखाली दबून धन्याने केलेली आत्महत्या... उघड्यावर आलेला संसार... काळी माती आणि पांढरे कपाळ घेऊन जगताना पदरात असलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या पालनपोषण, शिक्षणाचा आभाळाएवढा प्रश्न... या अडचणींचा सामना करताना धावून आलेल्या भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यातील ५५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. बीड येथून सोमवारी दुपारी ही मुले वाघोली शैक्षणिक प्रकल्पाकडे रवाना झाली. पाचवीला पुजलेल्या दारिद्र्याशी लढाई शिक्षणाने करण्यासाठी जाणाऱ्या या मुलांना निरोप देताना पालकांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

बीड येथील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी दुपारी बारा वाजता झालेल्या या निरोप समारंभास बीडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, नामचे राजाभाऊ शेळके, शिवराम घोडके, वसंत मुंडे, जिल्हा स्काऊटचे मुख्य आयुक्त संतोष मानूरकर, विजयराज बंब यांची उपस्थिती हाेती. जिल्ह्यात वर्षभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून बीजेएसचे प्रमुख शांतीलाल मुथा यांच्या पुढाकारातून भारतीय जैन संघटनेने या ७५ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात या मुलांचे शिक्षण होणार आहे. या वेळी बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक कलुबर्मे यांनी शिक्षणानेच परिस्थितीत बदल होत असल्याने बीजेएसच्या कामाचे कौतुक करून मुलांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक किशोर पगारिया यांनी, तर सूत्रसंचालन राजेंद्र मुनाेत यांनी केले. गौतम खटोड यांनी आभार मानले. या वेळी नागरिक, पालक उपस्थित होते. या मुलांच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी संस्थ घेणार आहे.

बाबा रोज मारायचे, उपाशी ठेवायचे
तिन्हीमुली झाल्याने नवरा सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मुलींसह इच्छामरणाची मागणी करणाऱ्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अनिता विष्णू देवकुळे या विवाहितेला बीजेएसने वाघोलीत नोकरी दिली मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. या वेळी सोनल देवकुळे या मुलीने आपबीती सांगितली. बाबा रोज मारायचे, आईला, आम्हाला उपाशी ठेवायचे, कोंडून घ्यायचे हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले. तिची आपबीती ऐकताना उपस्थितांनाही गलबलून आले.

छळापासून कृष्णाची मुक्तता
पाटोदातालुक्यातील महेंद्रवाडीचा कृष्णा लवांडे. आईचे चार वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झालेले. सावत्र आईकडून छळ होत होता. दोन-तीन दिवसांपासून उपाशी कृष्णा आईच्या समाधीवर जाऊन रडायचा. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. काही पत्रकारांनी मुलाची माहिती संघटनेला दिली. तो कृष्णाही शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाला.