आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Farmer Daughter Marriage Today At Ambajogai

'त्या' पीडित शेतकऱ्याच्या मुलीचा आज होणार विवाह; मुलीसाठी एकवटले सारे गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- एकीकडे दुष्काळाचे संकट, दुसरीकडे मुलीच्या विवाहाची तारीख जवळ आल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली. या दु:खात त्यांच्या मुलीचा ठरलेल्या तारखेलाच विवाह व्हावा म्हणून राजकीय नेत्यांबरोबरच ग्रामस्थांनी पुढाकार घेत तयारी केली. बुधवारी अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे या पितृछत्र हरवलेल्या मुलीचा विवाह होत आहे. यात आजी-आजोबा कन्यादान करतील.

मुडेगाव येथील शेतकरी प्रकाश गोविंदराव जगताप (४८) यांनी १० एप्रिल रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना ११ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलगी राधाचा विवाह कसा होणार हा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. अंबाजोगाई तालुका काँग्रेसने या विवाहासाठी पुढाकार घेत राधाच्या लग्नाचा खर्च उचलला. बुधवारी दुपारी १२.३१ वाजता मुडेगावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राधाचा विवाह सोहळा होणार आहे. वडिलांच्या आत्महत्येमुळे आता राधाचे कन्यादान तिचे आजोबा गोविंदराव जगताप-आजी मंदोदरी हे कन्यादान करणार आहेत.

दानशूरांची दीड लाखाची मदत
खासदार प्रीतम मुंडे यांनी ५० हजार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ५० हजार, खासदार रजनी पाटील २५ हजार, मराठा महासंघ १० हजार, साहित्यिक दगडू लोमटे १० हजार यांच्यासोबतच बीड येथील इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे यांनी वधूला संसारोपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंबा कारखान्याचे उपाध्यक्ष हणमंत मोरे, माजी जि.प.सदस्य संजय दौंड, दाजीसाहेब लोमटे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, संजय भोसले लग्न खर्च उचलत आहेत.