आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून बँक कर्मचा-याची आत्महत्या, जालना येथील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - बँकेत नोकरीला असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून करत बँकेतच असलेल्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या केली. दोघांच्या लग्नाला तीन महिनेच झाले होते. चारित्र्याच्या संशयातून संध्याची हत्या झाल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली. मूळ अकोला येथील रुपेश पायधने (२८) हे पत्नी संध्यासह (२६) शिवनगरात राहत होते.

मोतीबाग उड्डाणपुलाजवळ मनमाड-हैदराबाद गाडीखाली रूपेशचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळावरील मोबाइलवरून संध्याचा औरंगाबादेतील भाऊ विवेकसह इतर नातलगांना घटना कळवली. संध्या फोन घेत नसल्याने विवेकने या दांपत्याच्या घरमालकांना घरात बघण्यास सांगितले. दुसऱ्या चावीने घरमालकांनी पायधने यांचे घर उघडले. तेव्हा पलंगावर संध्याचा मृतदेह आढळला. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उिशरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
संध्या मूळची बुलडाणा जिल्ह्यातील िपंपरी कोरडे (ता. खामगाव) येथील तर रूपेश अकोल्याचा रहिवासी होता. पिंपरी येथे ५ जूनला त्यांचे लग्न झाले होते. संध्या जालना येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजी पुतळ्याजवळील शाखेत होती. रूपेश मुंबईत पंजाब नॅशनल बँकेत नोकरीस होता. लग्नाआधी भाड्याने राहत असलेल्या घरातच संध्याने नंतर तीन खोल्यांचा ब्लाॅक भाड्याने घेतला होता. रूपेश दर शनिवारी येऊन सोमवारी परत जात असे. गेल्या शनिवारी आल्यानंतर तो परत गेलाच नव्हता. औरंगाबादच्या विवेकानंद काॅलेजमधून संध्याने मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट, तर रूपेशने नागपूर येथून मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन केले होते. पोलिसांनी संध्याच्या घरातून काही दस्तऐवज व एक सीडी ताब्यात घेतली आहे. त्यात मोबाइल क्रमांकाचे कॉल डिटेल्स आहेत.

व्हिसेरा तपासणीला पाठवणार
संध्याचा व्हिसेरा उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात येईल. गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता प्राथमिक वैद्यकीय अहवालात आहे. पती रूपेश हाच मृत्यूस कारणीभूत असल्याच्या तिच्या नातलगांच्या तक्रारीवरून रूपेशविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल.
अनिल विभुते, पोलिस निरीक्षक.