आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी: वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर आईसह 2 मुलीची आत्महत्या, मुलानेही घेतले विष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणीतील नानलपेठ भागातील चंद्रकांत डांगे यांचे घर. - Divya Marathi
परभणीतील नानलपेठ भागातील चंद्रकांत डांगे यांचे घर.
परभणी - शहरातील नानलपेठ भागात एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलींनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. वडिलांच्या मृत्यूनंतर तिघींनी हा प्रकार केला, तर मुलानेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकाराला आर्थिक विपन्नावस्था हे कारण असल्याची चर्चा आहे.

शहरातील नानलपेठ भागात चंद्रकांत डांगे व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. पिढीजात असलेल्या घरात डांगे यांच्यासह त्यांची पत्नी शैला (६४), मुली रेणुका व प्रणिता, मुलगा सदानंद (३८) हे वास्तव्यास होते. दोन्ही मुली व मुलाचे लग्नही झालेले नाही. हे कुटुंब समाजापासून दूरच होते. त्यांचा आजूबाजूच्या लोकांशीही संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचा सराफा व्यवसाय होता.
चंद्रकांत डांगे हे आजारी होते. सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी शैला व एका मुलीने मधल्या खोलीत, तर एका मुलीने स्वयंपाकघरात गळफास घेतला. एका मुलीने ब्लेडने हातावर मारूनही घेतले असल्याची बाब समोर आली. दरम्यान, वडिलांपाठोपाठ आई व दोन बहिणींनी जीवनयात्रा संपवल्याचे पाहून मुलगा सदानंद यानेही विष प्राशन करून एका मित्राला फोनवरून ही बाब सांगितली. त्यामुळे काही मंडळी रात्री साडेसातच्या सुमारास घरात पोहोचताच हे भयावह चित्र दिसून आले. वडील समोरच्या खोलीत मृतावस्थेत, तर तिघींनी गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलगा सदानंद अत्यवस्थ अवस्थेत होता. त्याला तातडीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल रऊफ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय हिबारे, सहायक निरीक्षक झुंजारे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चिठ्ठित काय लिहीले होते..
बातम्या आणखी आहेत...