आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी: वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर कुटुंबाची आत्‍महत्‍या, मुलाचाही मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या परभणीच्या नानलपेठ भागातील चंद्रकांत डांगे कुटुंबीयांचा सामुदायिकरीत्या जीवनाचा अस्त करण्याचे विविधांगी मार्ग पोलिसांच्या तपासात समोर येऊ लागल्यानंतर भीषण वास्तवतेने अधिक धीरगंभीर होण्याची वेळ आली आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर १५ वर्षे आर्थिक संकटांचा सामना करताना वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या कुटुंबप्रमुखावरदेखील उपचार करण्यात कमी पडल्याची चिंता वाहताना या कुटुंबातील पत्नीसह दोन मुली व मुलानेही जीवनयात्रा संपविण्याचे मार्ग स्वीकारले. पत्नीसह दोन मुली तर संपल्या. परंतु स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न करणारा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता, अखेर त्याचाही मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
नानलपेठ शहराची ओळख असलेला अत्यंत जुना भाग. दुमजली जुन्या काळातील सधन कुटुंबीयांचे वाडे मुख्य रस्त्यावर वसलेली आहेत. त्यातील काही मंडळी पुण्या, मुंबईस विस्थापित झालेली आहेत. मोजकीच जुनी मंडळी आता या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काही वाड्यांच्या जागी नव्याने इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. यातीलच मुख्य रस्त्यावर असलेले चंद्रकांत सदाशिव डांगे (७०) हे देखील एकेकाळी सराफा व्यवसायात होते. पत्नी शैला, दोन मुली रेणुका (४०), प्रणिता (३२) व मुलगा सदानंद (३६) असे हे कुटुंब येथे वास्तव्यास होते. बाजारपेठेतील सराफा व्यवसाय बंद केल्यानंतर साधारणत: १९९८ पासून ते स्वत:च्या घरीच व्यवसाय करू लागले. परंतु व्यवसाय चालेनासा झाला अन् बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली. एक मुलगी एम.एस्सीपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली तर मुलगा सदानंदही डिप्लोमा इंजिनिअर झालेला असतांना त्याला मनासारखी नोकरी मिळत नसल्याचे कारण समोर येते. यातूनच हे कुटुंब समाजापासून अलिप्त राहत होते. अगदी शेजारी-पाजाऱ्यांशीही संबंधच नव्हता. नातेवाइकही दूर गेलेले होते. कुटुंबाची अलिप्ततेचे मुख्य कारण समोर येऊ शकलेले नाही. त्यातच दोन्ही मुली व मुलाचा विवाहदेखील झालेला नव्हता. १५ वर्षांपासून पूर्वीच्याच मिळकतीतून संसाराचा गाडा चालला. त्यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती कुटुंबाच्या अस्तानंतरच पोलिसांच्या नजरेस पडली. चंद्रकांत डांगे हे आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासही कुटुंबातील सदस्यांकडे पैसा नव्हता, असे कारण पत्नीसह दोन मुली व मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचाा, मुलाच्या मृत्यूची झुंजही ठरली अपयशी.., नातेवाइकांकडून अंत्यसंस्कार..
बातम्या आणखी आहेत...