आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची मुलासह आत्महत्या, पतीच्या छळामुळे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - तालुक्यातील खडकेश्वर येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने १२ वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सुशीला मस्के आणि सिद्धार्थ मस्के अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पतीकडून होणा-या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

खडकेश्वर येथील सुशीला कैलास मस्के व सातवीत शिकणारा सिद्धार्थ कैलास मस्के हे दोघे २० एप्रिल रोजी दुपारी घरातून निघून गेले होते. कैलासने दुसरे लग्न केल्याने सुशीला आणि कैलास यांच्यात या विषयावरून नेहमीच कडाक्याचे भांडण होत असत. कैलास हा सुशीलाला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून देत होता. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सुशीला आपल्या १२ वर्षांच्या मुलासह २० एप्रिल रोजी दुपारी घरातून निघून गेली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजता गावातील एकाने विहिरीत सुशीला व सिद्धार्थचा मृतदेह पाहिला. माहिती मिळताच घटनास्थळी येऊन पोलिसांनी दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेहाचे शवविच्छेदन अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मात्र, सुशीलाच्या माहेरच्या (वडीरामसगाव, ता. घनसावंगी) नातेवाइकांनी जोपर्यंत पतीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची
भूमिका घेतली.

अखेर सुशीलाचा भाऊ राजू गंगाराम पाखरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी सुशीलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती कैलास मस्के याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर माहेरच्या मंडळीने मृतदेह ताब्यात घेऊन खडकेश्वर येथे अंत्यविधी केला. सुशीलाच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे आई-वडील दोघे अंध असून भाऊ ऊसतोड कामगार आहे.