आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Summon The Special Session For Marathwada Drought : Uddhav Thakrare

मराठवाड्यातील दुष्‍काळाच्‍या चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा: उद्धव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - दुष्काळावर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या वेदना समजून घेण्यासाठी सत्ताधारी मराठवाड्यात फिरकलेच नाहीत. आता अशी बैठक न घेता दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

जालना येथे जाहीर सभेत त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि वीज बिल माफ झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणीही केली.शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव यांची ही पहिलीच सभा होती. जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या सभेला हजारो शेतक-या सह शिवसैनिक उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती दिली आहे. शेतक-या चे मोठे नुकसान झाले असताना स्थगिती चालणार नाही तर कर्जमाफी द्यावीच लागेल. नाही तर शेतकरी चांगले पीक येईपर्यंत एकही पैसा भरणार नाहीत. सन 2012 मध्ये राज्य भारनियमनमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा मात्र प्रत्यक्षात आलीच नाही. सन 2004 मध्ये सत्ता दिली तर संपूर्ण वीज बिल माफ करू, असे वचन शिवसेनाप्रमुखांनी दिले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकीच्या तीन-चार महिने आधी मते मिळवण्यासाठी शून्य रुपयांची बिले पाठवली. तेव्हा मते मिळवण्यासाठी वीज बिल माफ केले. आता दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी बिले माफ करा.

या वेळी व्यासपीठावर शिवसेना नेते रामदास कदम, दिवाकर रावते, संजय राऊत, लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर, अनिल देसाई, नीलम गो-हे, चंद्रकांत खैरे, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संतोष सांबरे आदींची उपस्थिती होती.


गढूळ पाणी मुख्यमंत्र्यांच्या घशात उतरवा
मराठवाड्यात पुरवले जाणारे पाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. ते मुख्यमंत्र्यांना पाजा, असे म्हणत उद्वव यांनी गढूळ पाण्याची बाटलीच उपस्थितांना दाखवली. राज्यात दुष्काळ असताना मंत्र्यांनी फिरणे बंद केले असून ते केवळ एसी गाड्यात आणि घरात बसले आहेत. त्यांना बाहेर काढा व जाब विचारा.

छावणीतील शेतक-या साठी आरोग्य शिबिर
या सभेनंतर संपूर्ण मराठवाड्यात जाऊन दुष्काळग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील चारा छावणीत गुरांसोबत हजारो शेतकरी थांबले आहेत. त्यामुळे त्या शेतक-या च्या आरोग्यावर परिणाम होत असून चारा छावणीत थांबलेल्या शेतक-या साठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर सुरू करू.

शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळावी
नुसते कागदावर नियोजन न करता शासनाने प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. ही मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या आमदार, खासदारांनीही लक्ष ठेवावे.
भावनिक साद, साष्टांग दंडवत
भाषणात सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक म्हणजे आई जगदंबेचे रूप, शंकराचे तिसरे नेत्र आहेत, असे शिवसेनाप्रमुख सांगायचे. पक्षप्रमुख झाल्यानंतरची ही माझी पहिलीच सभा आहे. कारकीर्दीस सुरुवात करताना तुमच्यासमोर नतमस्तक होतो आहे, असे म्हणत त्यांनी जनसमुदायास साष्टांग दंडवत घातला. 1988 मध्ये औरंगाबाद मनपात शिवसेनेची सत्ता आली त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अशाच प्रकारे जनता जनार्दनाला दंडवत घातला होता.
मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत
प. महाराष्ट्रा तील मंत्री टगे, तर मराठवाड्याचे मंत्री काय गॅसचे फुगे आहेत काय? आम्हाला भीक नको, मदतीचा हात हवा. ती मिळणार नसेल तर मराठवाड्यातील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे उद्धव म्हणाले.
शिंदे म्हणजे ‘जी हुजूर’
देशात भगवा दहशतवाद असल्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सांगत आहेत. मग ते कारवाई का करत नाहीत? हिंदुत्ववाद्यांना अतिरेकी ठरवताना ते पाकच्या अतिरेक्यांना ‘जी हुजूर’ करतात, असे उद्धव म्हणाले.
सोनिया गांधींना आव्हान
पंतप्रधानांच्या सभेपेक्षा येथे दहापट जास्त गर्दी आहे. सोनिया गांधींनी अशी सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान देताना ही गर्दी उद्वव बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला झालेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ओवेसी, अंगावर तर ये...
पंधरा मिनिटे पोलिसांना बाजूला केल्यास 25 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदूंना भारी पडतील, या ओवेसीच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, अंगावर येऊन तर बघ, परत जाशील का ते बघू!