जालना - दुष्काळी परिस्थितीतील शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात आले नव्हते. त्यांच्या नियोजनात मराठवाडा नव्हता. ते केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक असल्याने आैरंगाबाद येथे आले होते. शासन दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जालना येथे बुधवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार राजेश टाेपे, शंकरअण्णा धोंडगे, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार नरेंद्र पाटील, इक्बाल पाशा, माजी आमदार चंद्रकांत दानवे, नीलेश राऊत, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, राजेश राऊत, अॅड. पंकज बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तटकरे म्हणाले, शासनाला दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव नाही. तीन महिन्यांमध्ये शासनाने २० हजार कोटींची मागणी केली आहे. यामध्ये शेतकर्यांसाठी या शासनाने एक छदामही मागणी केलेली नाही. जालना जिल्ह्यात एक प्रदेशाध्यक्ष, एक मंत्री असतानाही चारा छावण्यांची तरतूद करताना जिल्हा वंचित कसा राहिला हा प्रश्न असून येथील सत्ताधार्यांची "गावात नाही पत अन् नाव म्हणता गणपत' अशी अवस्था झाल्याचा टोला तटकरे यांनी लगावला.