आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstition World : Black Magic Man Doesn't Stopped His Work After Bond

अंधश्रध्‍देच्या जगात: हमीपत्रानंतरही बाबाचे दरबार भरवणे सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - बोरजा (ता. औंढा नागनाथ) येथील राजू पांडुरंग वानखेडे ऊर्फ साखरबाबा याचे चमत्काराचे कारनामे सुरूच आहेत. चार महिन्यांच्या खंडानंतर राजूने पुन्हा नवा दरबार भरवणे सुरू केले असून पोलिसांनी मात्र केवळ समज देण्याचे सत्र चालू ठेवले असून दररोज हजारो भाविकांची फसवणूक होत आहे. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी ठाण्यात बोलावले खरे, मात्र चार तास त्यास बसवून ठेवले.


साखरबाबाने दीड वर्षापासून भाविकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याला नोटिसा बजावून दर्शन सोहळा गुंडाळण्याचे आदेश पोलिसांनी दिल्यानंतर काही काळासाठी दरबार बंद होता. त्या वेळी त्याने पुन्हा दरबार भरवणार नसल्याचे लेखी आश्वासन पोलिसांना दिले होते; परंतु आठ दिवसांपासून दरबार पुन्हा सुरू झाला. त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी त्याला पोलिसांनी नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सकाळी 11 वाजता राजू वानखेडे येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामीण) कार्यालयात दाखल झाला. दुपारी साडेचार वाजता पोलिस उपअधीक्षक नीलेश मोरे यांनी यापुढे दरबार भरवणार नाही आणि पुन्हा आदेशाचे उल्लंघन करणार नसल्याचे बाबाकडून वदवून घेतले.


साखरबाबाचे अर्थकारण : बुधवार आणि गुरुवारी 7 हजार तर इतर दिवशी 1 हजार भाविक येतात. बाबाचे दर्शन घेऊन नारळ आणि साखर अर्पण करतात. त्या बदल्यात हा बाबा भाविकांना चिमूटभर साखर देतो. अर्पण नारळ व साखर एका दुकानांमध्ये जाते आणि पुन्हा विक्री होते.


साखरबाबाच्या दरबारामुळे रस्ता जाम
साखरबाबाच्या दरबारात दर्शन घेऊन प्रसाद म्हणून साखर घेण्यासाठी बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. हे भाविक खासगी वाहने घेऊन येत असल्याने बोरजा पाटीवर सुमारे एक किमीपर्यंतचा औंढा-हिंगोली रस्ता जाम होत आहे. दर बुधवार आणि गुरुवारी दरबाराचे स्वरूप मोठे असते. त्यामुळे या दिवशी तर बोरजा येथे जत्राच भरते. आज दिवसभर साखरबाबा हिंगोलीत असल्याने व बाबाला अटक होणार असल्याच्या चर्चेमुळे भाविकांची संख्या कमी होती. तसेच आजचा दरबार रद्द झाल्याचे भाविकांना अगोदरच सांगण्यात आल्याने बाहेरगावचे भाविक आले नव्हते.


चमत्कार नव्हे... भाविकांची व्यसनमुक्ती
चमत्काराच्या नावाखाली येणा-या भाविकांची पिळवणूक करीत असल्याचा पोलिसांचा आरोप साखरबाबाने फेटाळला आहे. आपण चमत्कार नव्हे, तर भाविकांची व्यसनमुक्ती करीत असल्याचे त्याने पोलिस उपअधीक्षक नीलेश मोरे यांना सांगितले. व्यसनमुक्ती केंद्राला परवाना आहे काय, या प्रश्नावर मात्र त्याची पंचाईत झाली; परंतु आपण लवकरच परवाना काढणार असल्याचे पोलिसांना सांगून वेळ मारून नेली.


जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार
सहा महिन्यांपूर्वी जादूटोणा करीत असल्याप्रकरणी साखरबाबाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. साखरबाबाची वर्तणूक सुधारली तर नाहीच; उलट त्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांना बोलावणे सुरू केल्याने औंढा नागनाथ न्यायालयात त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. जामीन रद्द झाल्यास त्याला अटक करण्यात येईल.’
नीलेश मोरे, पोलिस उपअधीक्षक (ग्रामीण)