आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात गुटखाबंदीनंतर दारूबंदीसाठी पाठपुरावा करणार : खासदार सुप्रिया सुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात गुटखाबंदीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणेच दारूबंदीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती मेळाव्यात बुधवारी दिली. व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात त्यांनी युवतींशी संवाद साधला.
या मेळाव्यासाठी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील, यशस्विनी अभियानाच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुळे म्हणाल्या, मराठवाड्यात अल्पवयीन मुलींचे विवाह लावले जातात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. मुलींनी या प्रकाराला विरोध केला पाहिजे.
कंडक्टरचे नाव कळवा- खेड्यातून शहराकडे शिक्षणासाठी येणा-या मुलींची छेड काढण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याच्या तक्रारी मुलींनी माझ्याकडे केल्या आहेत. त्यामुळे यापुढे प्रतिकार करण्यासाठी तुमच्या एका हाताला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दुस-या हाताची मदत मिळेल. सवलतीच्या पासवर प्रवास करणा-या मुलींना कंडक्टरकडून हीन वागणूक दिली जाते. अशा कंडक्टरचे नाव, बसचा क्रमांक कळवा, पुढे त्याचे काय करायचे, ते गृहमंत्री पाहतील, असेही सुळे म्हणाल्या.
माहितीपटामध्ये झळकले संगमा!- राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पी. ए. संगमा बुधवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माहितीपटात माहिती देताना दिसून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे कार्यकर्ते काही वेळ गोंधळात पडले. यात पक्षाध्यक्ष शरद पवारांपासून प्रमुख नेत्यांची भाषणे होती. यामध्ये पी. ए. संगमा, अगाथा संगमा यांचेही भाषण होते. भाषणाची दुरुस्ती करायची राहून गेली आहे, ही दुरुस्ती केली जाईल, असे खासदार सुळे म्हणाल्या.