आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी प्रस्थापित मराठ्यांचा पक्ष, यात गरीब मराठ्यांना किंमत नाही; सुरेश धस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धसांनी भाजपला केलेल्या मदतीने त्यांना राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केल्यानंतर सुरू झालेल्या प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित विरुद्ध सुरेश धस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी कडाक्याच्या उन्हात जिल्ह्यात राजकीय गरमागरमी सुरू झाली आहे. प्रकाश साेळंके, अमरसिंह पंडितांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धस यांच्या कुटुंबापर्यंत केलेल्या टीकेचा रविवारी सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. प्रकाश सोळंकेंचे पराभवामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे, तर पंडितही दगाबाज असल्याचा पलटवार करताना राष्ट्रवादी हा प्रस्थापित मराठ्यांचा पक्ष असून छोट्या मराठ्यांना किंमत नसल्याचा आरोप धस यांनी केला. सोळंके, पंडितांचे बोलविते धनी वेगळेच असल्याचे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंकडेही अंगुलिनिर्देश केला. 

शासकीय विश्रामगृहावरील सुरेश धस यांच्या पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस, गेवराईचे शिवसेना नेते माजी आमदार बदामराव पंडित, सभापती युधाजित पंडित, जयदत्त धस यांची उपस्थिती होती. धस म्हणाले, केवळ बीडमध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजपला मदत केली असे नाही तर सोलापूर कोल्हापुरातही हा प्रकार घडला. परंतु राष्ट्रवादीने माझ्या एकट्यावर कारवाई केली, तीही एकतर्फी असून अद्याप माझ्यावर कारवाई का केली, या माझ्या प्रश्नाला उत्तर आलेले नाही. मी कारखानदार, शिक्षणसम्राट नाही, गरीब मराठा आहे, तर सोलापूर-कोल्हापूरवाले कारखानदार, शिक्षणसम्राट असे मोठे मराठे असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. 

राष्ट्रवादी हा प्रस्थापित मराठ्यांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंकेंच्या आरोपांवर त्यांनी खरपूस पलटवार केला. कुटुंब, बायको, मुलांपर्यंत जाऊन टीका करणाऱ्यांनी आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवू नये. माझ्या वडिलांना लुटारू, दरोडेखोर मला गद्दार म्हणणाऱ्या सोळंकेंच्या वडिलांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना १२ आमदार फोडून उपमुख्यमंत्रिपद मिळवून गद्दारी केली. त्यामुळे सोळंकेंना गद्दारीचा वारसा मिळाला. तुम्हाला शदर पवार पक्षात घेत नसताना मी आग्रह करून घेतल्याचे धस म्हणाले. 

अमरसिंहपंडित घरफोडे, बँक लुटारू...
आमदारअमरसिंह पंडित यांनी गढी, उमापूर, गेवराईत शासकीय जमिनी हडपल्या आहेत. डीसीसी बँकेचे १२ गुन्हे नोंद असलेल्या अमरसिंहांनी माझ्याविषयी बोलणे म्हणजे विजय मल्ल्याने आदर्श बँकिंगचे उदाहरण देण्यासारखे असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. 

पक्षप्रवेशाबाबत अजून निर्णय नाही 
राष्ट्रवादीतून निलंबनानंतर धस कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागले असताना धसांनी मात्र रविवारीही याबाबत मौनच बाळगले. मी अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना प्रवेशाची चर्चा आणि पत्रकार परिषदेस बदामरावांची उपस्थिती याबाबत विचारले असता, आमचे संबंध चांगले आहेत म्हणून ते आल्याचे म्हणाले. पण त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. 

सगळ्या आरोपांना उत्तर 
खुल्या जागेवर ओबीसी अध्यक्ष केल्याच्या आरोपांना उत्तर देताना शोभा पिंगळे यासुद्धा खुल्या जागेवरून अध्यक्ष झाल्याची आठवण त्यांनी करून दिली, तर एसीबीची चौकशी, छावणी चाैकशीचे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले. नाव घेता त्यांनी धनंजय मुंडेंवरही टीका केली. 

राजकारणाचा सिनेमा, जनता प्रेक्षक 
काहीदिवसांत धस, सोळंके, पंडितांच्या राजकारणी सिनेमाने जिल्ह्याचे मनोरंजन होत आहे. सोळंके बप्पी लहिरी तर पंडित सरकटे बंधू असल्याची टीका धसांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना धस हे धर्मेंद्र, त्यांची पत्नी हेमामालिनी असून ते सदाशिव अमरापूरकर असल्याचे सोळंके म्हणाले होते. त्यावर आज पुन्हा धसांनी कडी केली. कुणाची बायको अरुणा इराणी आहे, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. माझ्या घरात सगळे मराठा असून मला कुणालाही पाजी म्हणून सतश्री अकाल करावा लागत नसल्याचे सांगत त्यांनी सोळंकेंच्या कुटुंबातील आंतरधर्मीय विवाहाकडे लक्ष वेधले. तर माझ्या दोन्ही आईंना मी सांभाळतो, रेस्ट हाऊसवर ठेवण्याची वेळ आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा धसांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन... 
बातम्या आणखी आहेत...