आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात जातीय दंगली घडवण्याचे कारस्थान : सुशीलकुमार शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - ‘काही प्रवृत्ती जातीय देशात दंगली घडवण्याचे कटकारस्थान रचत आहेत,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी भाजपचे नाव न घेता केला. मात्र आम्ही सतर्क असल्यामुळे हे कारस्थान यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले. लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, वैशालीताई देशमुख, उल्हास पवार, मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शिंदे यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या.

‘लातूरमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराला मी येत असे. त्या वेळी विलासराव असायचे. आज त्यांच्याशिवाय लातूर ही कल्पनाच सहन होत नाही. सोलापूरहून लातूरला जाताना मी विकासाची ‘जकात’ भरूनच जाईन, असा शब्द विलासरावांनी दिला होता आणि तो खरा करून दाखवला. त्यांच्या पश्चात मीही लातूरकरांना हाच शब्द देत असल्याचे शिंदे म्हणाले.

भाजपमध्ये ज्येष्ठांची अवस्था वाईट : पवार
उपमुख्यमंत्री पवारांनी शिवसेना-भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. शिवसेनेचे सगळे खासदार-कार्यकर्ते नेतृत्वाला कंटाळून पक्षत्याग करीत आहेत. तिथं कुणालाच काही कळत नाही असा टोला पवार यांनी लगावला. भाजपमध्ये अडवणी-जसवंतसिंहांसारख्याची अवस्था वाईट झाली आहे. महापालिका निवडणुकीतले सगळं विसरा आणि कामाला लागा, असा संदेश त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

मोदी म्हणजे गारपीट
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणजे गारपीट आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी म्हणजे मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पेरण्या होतात. पीक येते. सुगी येते, असे म्हणत आमदार दिलीपराव देशमुख यांनी भाजपवर टीका केली. आमदार अमित देशमुख यांनीही भाजप उमेदवारावर टीका केली.