आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कारितेचा गर्भपात: पोलिस निरीक्षक निलंबित; आरोपींना वाचवण्यासाठी पुरावे केले नष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- अल्पवयीन बलात्कारपीडितेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात करणाऱ्या पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले.  आरोपींविरुद्धचे पुरावे नष्ट करणे, आरोपींना सहकार्य करणे, पीडितेवर दबाव टाकणे असा ठपकाही ठेवण्यात आला असून त्यांना या प्रकरणात सहअारोपी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.    

 

 देवणी तालुक्यातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीला अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार याने पळवून नेऊन बलात्कार केला होता. तसेच महिनाभर डांबून ठेवले होते. यातून मुलीला गर्भ राहिला. मुलीने सुटका करवून घेतल्यानंतर ती पालकांसह देवणी ठाण्यात आली.

 

तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार येऊनही तत्कालीन पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यानी बलात्काराचे कलम लावले नाही. दुसऱ्याच दिवशी मुलीचे पोट दुखत असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात गर्भ असल्याचे लक्षात आले. मुलगी पुन्हा देवणी ठाण्यात गेली. मात्र या वेळी पोलिस निरीक्षकाने मुलीचा सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक पाटील यांनी स्वत:च मुलीला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. परिणामी मुलीचा गर्भपात झाला. या प्रकरणाचे मूळ तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम रजेवरून परतल्यानंतर त्यांनी या प्रकरणात पुन्हा तपास केला. मुलीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला.

 

तपासानंतर कारवाई 
या प्रकरणाचा तपास लातूर ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडे देण्यात आला. प्रिया पाटील यांनी प्रकरणाची चौकशी करून पोलिस निरीक्षकाविरोधात अहवाल दिला. त्याआधारे पोलिस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले.  त्याचबरोबर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणे, गर्भपात करून बलात्काराचे पुरावे नष्ट करणे या अनुषंगाने प्रकरणात निरीक्षकालाही सह आरोपी करण्याची शिफारस आहे. 

बातम्या आणखी आहेत...