आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात स्वाइन फ्लूचे ४ रुग्ण पॉझिटिव्ह, १४ संशयित रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, शनिवारपर्यंत दाखल झालेल्या चार पॉझिटिव्ह, तर १४ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने शंभर मीडिया किट खरेदी केल्या आहेत. दरम्यान, आंध्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर व निलंगा या तालुक्यांच्या ठिकाणीही आयसोलेटेड वाॅर्ड सुरू करण्यात आले आहेत.

स्वाइन फ्लूमुळे लातुरात दोघांचा बळी गेल्यानंतर जिल्ह्यात त्याची साथ फैलावत आहे. त्यानुसार सरकारी पातळीवर प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येथील सर्वोपचार रुग्णालयात संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी दोन स्वतंत्र आयसोलेटेड वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. आंध्र व तेलंगणा राज्यांतून ही साथ वेगाने पसरण्याचा धोका असल्याने सीमेवर असलेल्या उदगीर व निलंगा येथेही आयसोलेटेड वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. उदगीर येथे तीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. दाखल असलेल्या सर्व रुग्णांवर सरकारी दवाखान्यांतच उपचार करण्यात येत आहेत. रुग्णाला स्वाइन फ्लू झाला आहे की नाही, हे निश्चित होण्यासाठी त्याच्या थुंकीचे नुमने तपासावे लागतात. त्यासाठी स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. ते पाठवण्यासाठी मीडिया किट लागते. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा रुग्णालयाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून १०० मीडिया किट खरेदी केल्या आहेत.

गहाळ स्वॅब पॉझिटिव्ह
येथील जिल्हा रुग्णालयातून चार दिवसांपूर्वी तीन रुग्णांचे थुंकीचे नमुने (स्वॅब) पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी एकाचा नमुना गहाळ झाला होता; परंतु तो प्रयोगशाळेतच सापडला. त्याचा अहवाल शुक्रवारीच आला असून, तो पॉझिटिव्ह आहे. - डॉ. दीपक कोकणे, अधीक्षक, जिल्हा रुग्णालय