आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहापाणी नंतर घ्या, आधी शेतावर चला: अवघ्या ३६ मिनिटांत आटोपला जालना दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- रिमझिम पावसात पथकाचा जालना दौरा । हमे पता है, ३ साल से बारिश नहीं, इस बारिश से कुछ नहीं होगा, हम रिपोर्ट करेंगे - राघवेंद्र सिंग यांचे धीराचे बोल
पथकाने विश्रामगृहातच माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी संतप्त

दोदडगावनंतर वडीगोद्री येथील अंकुश रामभाऊ गाढवे यांच्या शेताची पाहणी पथक करणार होते. मात्र, पथक थेट विश्रामगृहात आले व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेऊ लागले. दरम्यान, चहा-बिस्किटांचा नाष्टाही मागवला. शेतकरीही विश्रामगृहात आले. पोलिस व काही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाहेर जाण्याचे सांगितले. बाहेर जा, असे म्हणताच शेतकरी संतापले. ढकलू नका, पाणी नाही, चारा नाही, पिके जळाली, अगोदर शेतावर चला, चहापाणी नंतर घ्या, असे म्हणून शेतकऱ्यांनी पथक व सोबतच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दरम्यान, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नायक व निधी पांडे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी संतापले.

केंद्रीय पथक येणार व आता पॅकेज मिळणार ही भाबडी आशा बाळगून सकाळी ९ वाजेपासून दोदडगाव (ता. अंबड) फाट्यावर शेकडो शेतकऱ्यांचे डोळे पथकाकडे लागून होते. सकाळी नियोजित १०.३० वाजेचा दौरा असताना १२ वाजले तरी पथक येईना. तेवढ्यात वरुणराजाने हजेरी लावली. मात्र, महागडं बियाण आणून दुबार पेरणी केली तरी पाऊस न अाल्यामुळे पिके करपली. आता काळ्या रानात पाऊस पडून काय उपयोग अशी चर्चा सुरू होती. तेवढ्यात पथकाचा लाल दिव्यांचा ताफा आला. दरम्यान, शेतात माल नाही, पाणी नाही, काय करावं, खर्च नाहक गेला, असे म्हणत ढाकलगावचे शेतकरी विश्वनाथ शेडगेंनी व्यथा मांडली. तर पथकातील राघवेंद्र सिंग (सहसचिव तथा आयुक्त, केंद्रीय दुष्काळ नियंत्रण, दिल्ली) यांनी हमे पता है, ३ सालसे बारीश नही, इस बारीशसे कुछ नही होगा, हम रिपोर्ट करेंगे, असे म्हणत धीर दिला.

औरंगाबाद-बीड महामार्गाने १२.१४ मिनिटांनी केंद्रीय पथक आले. जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी राघवेंद्र सिंग यांच्या डोक्यावर छत्री पकडली. तेवढ्यात गर्दीतील एकाकडून छत्री घेऊन राघवेंद्र सिंग पुढे निघाले. या वेळी जिल्ह्यातील पाऊस, पिकांची स्थिती, दुबार-तिबार पेरणीचे आकडे जिल्हाधिकारी ए. एस.आर. नायक यांनी पथकासमोर मांडले, तर नेमकी कोणत्या ठिकाणी पाहणी करायची तेथे चला, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले. या वेळी आमचे ऐका, असे म्हणत शेतकऱ्यांनी पथकाला गराडा घातला. चार वर्षांपासून दुष्काळ आहे, पाणी नाही, जनावरांना चारा नाही, काय करावं, कस जगावं, असे म्हणून पथकाला साकडे घालण्यात आले. पथकातील सदस्यांनीसुद्धा म्हणणे ऐकून काहीसा धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती संपेना. त्यामुळे प्रथम पाहणी करू, असे पथकातील सदस्य म्हणाले व सुधीर मोळवणे (दोदडगाव) यांच्या शेताच्या दिशेने ताफा सरसावला. मोळवणे यांच्या शेतात खोदलेल्या १० टीसीएम पाणी साठवण क्षमतेच्या सामुदायिक शेततळ्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एल. तांभाळे यांनी दिली.

शेततळ्याच्या भिंतीवर चढण्याची कसरत
पाऊस सुरू झाल्यामुळे केंद्रीय पथकातील राघवेंद्र सिंग, अतुल पटले (संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम, दिल्ली), सुदाम अडसूळ (संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम, पुणे), कैलास मोते (सहसंचालक, कृषी विभाग, पुणे), उमाकांत दांगट (औरंगाबाद विभागीय आयुक्त), निधी पांडे (जिल्हाधिकारी, औरंगाबाद) यांच्यासह जालन्यातील सर्वच अधिकाऱ्यांना शेततळ्याच्या भिंतीवर चढ-उतार करताना एकमेकांचा आधार घ्यावा लागला.

पौधा एक सेकंड में खडा थोडी होता है
राघवेंद्र सिंग म्हणाले. छोटे किसानों को क्रॉप लोन दिया जाता है, क्रॉप इन्शुरन्स भी है. लेकिन बारिश नहीं हो रही, ४०-४५ दिन बाद बारिश हुई तो इसका कोई फायदा नहीं. बारिश के बाद कोई पौधा एक सेकंड में खडा थोडी होता है. वैसे भी एक-दो बार बुआई करने के बाद भी नष्ट हो गई. बारिश न होने के कारण कुछ किसान बुआई तक नहीं कर पाए. सभी जानकारी की रिपोर्ट हम पेश करेंगे.राघवेंद्र सिंग पथक प्रमुख
बांधावरूनच जाणून घेतली स्थिती
अंबड तालुक्यातील दोदडगाव व वडीगोद्री या दोन ठिकाणी भेटी देण्याचे नियोजन होते. मात्र, पथकाने फक्त दोदडगाव येथील सुधीर विनायक मुळवणे यांच्या शेतातील शेततळे व लांबूनच फळबागांची पाहणी केली. त्यानंतर सुदाम शिकारे या शेतकऱ्याच्या शेताला भेट देण्याचे नियोजन होते. मात्र, महामार्गाच्या कडेला उभे राहूनच पथकाने पाहणी दौरा उरकला.

स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा
पाऊस आला म्हणून दुष्काळ नाही, असे समजू नका. खरीप गेला, आता पावसाचा काय उपयोग? दरम्यान, शेतात पीक येईना व आलेल्या कापूस, सोयाबीन, उसाला भाव मिळेना. केंद्र सरकारने स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी गोंदी येथील शेतकरी के. बी. कोठारी यांनी पथकास केली.
अवघ्या ३६ मिनिटांत आटोपला जालना दौरा
वडीगोद्री येथील शेतकरी अंकुश रामभाऊ गाढवे यांच्या शेतात कापूस, सोयाबीन व उसाची पाहणी केली जाणार होती. मात्र, पथक गाडीतून खाली उतरलेच नाही. केवळ गाडीचा वेग कमी करून त्यांनी धावती पाहणी केली. त्यामुळे पथकाची सकाळपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
पथक केव्हा, कुठे गेले ?
१२.१४ वा. दोदडगाव फाटा येथे दाखल
१२.१४ ते १२.२० शेतकऱ्यांशी चर्चा
१२.२० ते १२.२५ शेततळ्याची पाहणी
१२.२५ ते १२.३० पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा
१२.३० वाजताशासकीय विश्रामगृहाच्या दिशेने
१२.३६ वाजता विश्रामगृहात दाखल
१२.३६ ते १२.३८ जिल्हाधिकारी नायक यांच्याशी चर्चा
१२.३६ ते १२.४० विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याशी चर्चा
१२.४० ते १२.४५ वडीगोद्रीच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले
१२.४५ ते १२.५० वडीगोद्री ते शहागड प्रवास
१२.५० वाजेनंतर ताफा गेवराईच्या दिशेने.

असा झाला बीड, गेवराई तालुका दौरा
दुपारी दीड वा. पथकाचे पाडळसिंगी येथे आगमन
दुपारी १.४५ कुंभारवाडी, भेट व शेतकऱ्यांशी चर्चा
दुपारी २ वा. मादळमोही येथे भेट
२.१७ वा. मादळमाेही येथून विश्रामगृह येथे ताफा दाखल
२.१७ ते ३.१५ शासकीय विश्रामगृह येथे जेवण, जिल्हास्तरीय अाढावा, नागरिकांची निवेदने स्वीकारणे
३.१७ वाजता पालीकडे रवाना
३.३४ ते ३.३९ पाली येथील बिंदुसरा प्रकल्प पाहणी
३.३९ ते ३.४४ मांजरसुंबा येथे शेतकऱ्यांनी गाडी अडवून चर्चा
३.४५ वा. चाैसाळामार्गे उस्मानाबादला पथक रवाना
जालना : भयावह चित्र
कागदावर बेदखल
दोदडगावात ५८४ गायी, १४२ म्हैसवर्गीय अशी एकूण ७२६ जनावरे आहेत. ६०० शेळ्या-मेंढ्या आहेत. मात्र पिण्याचे पाणी व पुरेसा चारा नाही. कामधेनू वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दिलेल्या २५० किलो मकाची ३ हेक्टरवर लागवड होऊ शकते. यामुळे प्रशासनाकडून कागदावरसुद्धा दोदडगाव बेदखल असून प्रत्यक्षात चित्र भयावह आहे.

राष्ट्रीय योजना धिमी
दोदडगाव-सौंदलगावासाठी राष्ट्रीय पेयजलअंतर्गत २६ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र हे काम धिम्या गतीने सुरू आहे. सौंदलगावात ३ हातपंप असून २ नादुरुस्त. तिन्ही हातपंपांना पाणी नाही. योजना पूर्ण झाल्यास गावाला पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दूरदर्शी आशावाद ग्रामसेविका के. सी. इंगळे यांनी बोलून दाखवला.

दुबार पेरणी
गावशिवारात १०८७.५७ हेक्टर क्षेत्रफळ असून पेरणीयोग्य क्षेत्र १००१ हेक्टर आहे. एकूण १४०० शेतकरी खातेदार आहेत. यात ९०० हे. खरीप, तर २०२ हे. रब्बी क्षेत्र आहे. चालू वर्षात ८०५ हे. खरीप पेरणी झाली असून ५१ हेक्टरवर पेराच झालेला नाही. दरम्यान, सुरुवातीला पेरणी केलेले पीक जळाल्यामुळे ३०० हेक्टरवर दुबार पेरणी झाली.
बातम्या आणखी आहेत...