आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यासपीठावरून उतरत राहुल थेट शेतकऱ्यांच्या गराड्यात; जाणून घेतली खरिपाची परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी / हिंगाेली- नांदेडपाठाेपाठ परभणी इथे सभा घेण्याचा राहुल गांधी यांचा नियोजित कार्यक्रम हाेता. मात्र, ऐनवेळी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर इथे शेतकरी संवाद व अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्याने राहुल गांधी यांच्या सुरक्षितेत असलेल्या रक्षकांची तसेच पाेलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली हाेती.

अचानक ठरल्यानंतर राहुल यांनी एरंडेश्वर येथील कार्यक्रम स्थळी भेट दिली. या ठिकाणी शामियाना व व्यासपीठ उभारण्यात अाले हाेते. मात्र, व्यासपीठावरून उतरत अचानक राहुल यांनी मंडपात जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. माईक स्वत: शेतकऱ्यांना देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इथेच त्यांनी अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. 

या पाठाेपाठ  एरंडेश्वर येथून वसमत रोड मार्गे सावली विश्रामगृहावर दाखल झाल्यानंतर तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह डॉक्टर्स, वकील, व्यापारी यांनाही राहूल गांधींनी वेळ दिला. त्यांचे हारतुरे स्वीकारले. त्याचबरोबर त्यांच्याशी संवादही साधला.
 
कनेरगावात घेतली खरिपाची माहिती : नांदेड येथील कार्यक्रम संपल्यानंतर नियाेजनाप्रमाणे राहुल गांधी ताफ्यासह परभणीकडे निघाले हाेते. वसमत जवळील जिंतूर टी-पाँईट व तालुक्यातील कनेरगाव येथे थांबत राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून खरीप हंगामाची माहिती घेतली.  वसमत येथे १२.३० वाजता दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी याच धावत्या भेटीत रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या कॉंग्रेस जणांचे स्वागत स्वीकारून, सर्वांना अभिवादन करत परभणीकडे प्रयाण केले. कनेरगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांच्या वाहनाचा ताफा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास  वसमत येते दाखल झाला.  या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिला कॉग्रेसच्या सीमा हाफिझ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी राहुल गांधी यांना गुलाब पुष्प देण्यासाठी आणि त्यांच्याशी हात  मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संतोष बोंधारे, सरचिटणीस अब्दुल हाफिझ अब्दुल रहेमान तालुका अध्यक्ष शंकरराव कऱ्हाळे आदी उपस्थित होते. 

नांदेड, परभणीत नेत्यांची मांदियाळी
राहुल गांधी यांच्या सभेसाठी दिग्गज नेत्यांनी नांदेड व परभणीतील सभेसाठी गर्दी केली हाेती. यात माजी केंद्रीय गृहमंत्री, शिवराज पाटील चाकूरकर, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार राजीव सातव, रजनीताई पाटील यांच्यासह आमदार अमर राजूरकर, डी. पी. सावंत, अमिता चव्हाण, वसंतराव चव्हाण, बसवराज पाटील, खा. रजनी पाटील, खा.राजीव सातव, आ.अब्दुल सत्तार, आ.संतोष टारफे, नसीम खान, युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...