आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरीमिरीसाठी वाहने अडवण्याचा प्रकार, पोलिस कारवाईचा निषेध, काळी-पिवळी चालकांनी पाळला बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ग्रामीण पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथील काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी सोमवारी (दि. ५) आपली वाहने बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बेकारीच्या परिस्थितीमुळे अनेक तरुणांनी स्वत:च्या रोजगारासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काळी-पिवळीद्वारे प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय निवडला. यासाठी बँक, फायनान्सकडून कर्जही घेतले. याच व्यवसायातून वाहनधारक आरटीओ कार्यालयाचे विविध कर भरत आहेत. मात्र, उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीच्या नावाखाली टॅक्सीचालकांवर कारवाई सुरू केली आहे.
एकीकडे अनेकजण खासगी पासिंगच्या वाहनांचा प्रवास कारणासाठी वापर करत असताना त्या वाहनांवर कारवाई करता टॅक्सीचालकांना मात्र प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना कारवाया केल्या जात असल्याचे म्हटले आहे. वाहने अडवून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरविणे, वाहनधारकांसह प्रवाशांनाही धमकावणे, टॅक्सीधारकांना विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, दंड भरण्यास नकार दिल्यास वाहन पोलिस ठाण्यात नेणे आदी प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे.
निवेदनावर मराठवाडा टॅक्सी, मॅटेडोर अॅन्ड जीप ओनर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गिरी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तानाजी सौदागर, बळीराम जगताप, विकास गरड, रवींद्र मोहिरे, बाबू गिरी, मुकेश गरड, ज्ञानेश्वर लोमटे, विनोद गिरी, कुंदन जानराव, नरसिंग शेंडगे, अखिल शेख, तोफीक शेख यांच्यासह काळी-पिवळी चालकांच्या स्वाक्षरी आहेत. सर्वांनी सोमवारी दिवसभर टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात पोलिसांवर चिरीमिरीचाही आरोप केला आहे. विनापरवाना खासगी वाहनांतून होणारी अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, चिरीमिरीसाठी होणारी टॅक्सीचालकांची अडवणूक थांबवावी अन्यथा जिल्हाभरातील टॅक्सीचालक त्यांची परवान्यासह आरटीओ अथवा पोलिस ठाण्यात जमा करतील तसेच त्यांचे कुटुंबीय अधिकाऱ्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर ताट, वाट्या घेऊन भीक मागो आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...