आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली : दुसऱ्या शाळेत जाऊ नये म्हणून टीसीवर मारला प्रवेशबंदीचा शेरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
हिंगोली - शाळेतील विद्यार्थी पटापट टीसी काढत असल्याने वैतागलेल्या वसमत येथील नूतन केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या टीसीवर लाल अक्षरात ‘स्थानिक प्रवेशबंदी’ असा शेरा मारून एक प्रकारे सदर विद्यार्थिनीच्या शिक्षणालाच प्रतिबंध करण्याची करामत केली.  

वसमत येथील प्रकाश सोनटक्के यांची सुकेशना नावाची मुलगी नूतन केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. याच शाळेत प्रकाश सोनटक्के आणि त्यांच्या भावांची अशी एकूण ६ मुले शिक्षण घेत आहेत. परंतु सुकेशनाचे नाव काढून तिच्या पालकांना इतर शाळेत टाकायचे आहे. त्यासाठी त्यांनी तिचा टीसी मिळण्यासाठी अर्ज केला होता. शाळेतून टीसी देण्यास नकार मिळत असल्याने वैतागलेल्या प्रकाश सोनटक्के यांनी मुख्याध्यापक ए. ए. रणवीर यांना भंडावून सोडले. तर शाळेतील विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी टीसी देण्यास नकार दिला. पालक ऐकत नसल्याने शेवटी मुख्याध्यापक रणवीर यांनी टीसी तर दिला; परंतु सदर विद्यार्थिनीला शहरात कुठेच प्रवेश मिळू नये यासाठी टीसीवर वरील भागावर स्पष्ट दिसेल असे लाल शाईने ‘स्थानिक प्रवेशबंदी’ असा शेरा मारला. विशेष बाब म्हणजे १६ तारखेला टीसी काढला, मात्र एक दिवस पुढची १७ जून २०१७ अशी तारीख टाकून सदर विद्यार्थिनीचे पालक प्रकाश सोनटक्के यांना देऊन टाकला. पालकाने टीसी पाहिल्यावर असा शेरा का मारला, याचा जाब विचारला असता तुम्ही शाळा का सोडून जाता, असा प्रश्न करून त्यामुळेच मी अशी मेख मारली, अशी फुशारकी मारली. 
 
त्यानंतर मुलीच्या वडिलाने याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली आणि प्रसिद्धी माध्यमांनाही सूचना दिली. प्रकरण अंगलट आल्याचे दिसताच मुख्याध्यापकाने मुलीच्या वडिलाला बोलावून घेत टीसीवरील शेरा दुरुस्त केला आणि प्रकरण दडपले. मुख्याध्यापक रणवीर यांनी केलेल्या या कारनाम्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली.  
 
वरिष्ठांच्या सांगण्यावरून मेख मारली  
मुख्याध्यापक रणवीर यांच्याशी संपर्क साधला असता, ही बाब आपण वरिष्ठांच्या सांगण्यावरून केली असल्याचे सांगून मुख्याध्यापक रणवीर यांनी आपली पडती बाजू उचलून धरली. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...