आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला आता धडा शिकवा, लासूर स्टेशन येथील सभेत रामदास कदम यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - काँग्रेस व राष्ट्रवादीने आजपर्यंत फक्त मताचे राजकारण करीत भ्रष्टाचार केला. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आगामी काळात भाजप अधोगतीकडे असून काला धनच्या नावाखाली नोटाबंदी करून सामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला गाडून टाका, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. 
 
हर्सूलसावंगी आणि शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर आणि शीतल प्रशांत बनसोड, पंचायत समिती गणातील उमेदवार संपत छाजेड तसेच ऊर्मिला विश्वनाथ बारसे यांच्या प्रचारार्थ लासूर स्टेशन येथील रेल्वे गेटजवळील मैदानावर पाच वाजता पार पडलेल्या प्रचार सभेत शिवसेनेचे पालकमंत्री रामदास कदम  बोलत होते.  

व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, संपत छाजेड, दिनेश मुथा, राजेंद्र दानवे, संजय जैस्वाल आदी उपस्थित होते.  शिवसेनेचा भगवा औरंगाबाद जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांवर फडकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना कदम यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ज्या ज्या नेत्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली आज ते सगळे नेस्तनाबूत झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा कळस केला. शिवसेनाप्रमुखांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आज स्वत: तुरुंगात आहेत. मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना तुरुंगात टाकण्याचे एकमेव काम केल्याचा उपरोधिक टोला कदम यांनी मारला.
 
शिवसेनेने तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान व मानाची पदे देऊन मोठे केले. ही ताकद फक्त शिवसेनेतच असल्याचे सांगत कडाडून टीका केली.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मुख्यमंत्र्याच्या तोंडाला फेस आणला. एकदा मुंबईच्या निवडणुका होऊ द्या, मग बघा आमचा टेकू काढून घेतल्यावर तुमचे हाल. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अन् मी गृहमंत्री होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गुंडांना जेलमध्ये टाकणार, असेही ते म्हणाले.   
कृष्णा पाटील डोणगावकर यांनी ‘चला लढूया, बदल घडवूया’ म्हणणाऱ्या आमदारांनी तालुक्यातील जनतेला खोटी अाश्वासने देऊन दोन वेळा आमदारकी मिळविली. कोठे झाले गुळगुळीत रस्ते, कोठे आली म्हैसमाळला रेल्वे, कोठे आहे टोमॅटो केचप कारखाना ही अाश्वासने हवेत विरली. परंतु आता आमदारांच्या पायाखालची वाळू सरकत असून भगवे वादळ भागात कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.
 
लासूरचा कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न तसाच आहे. आजही गावात टँकरचे पाणी घ्यावे लागते.  उमेदवार संपत छाजेड यांनीदेखील लासूरचा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अनेक मूलभूत सुविधांसाठी लासूरवासीयांची पंचायत झाली. त्यामुळे विकासासाठी आम्हाला जनतेने आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...