आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाला वर्गातून बाहेर काढून बेदम मारहाण; उस्मानाबादेतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये वर्गावर शिकवत असलेल्या शिक्षकाला वर्गाबाहेर ओढत आणून सात जणांच्या टोळक्याने चैन, स्टीक, केबल वायर, काठीने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी शाळेच्या मैदानावरच घडला. भोसले हायस्कूलमधील सहशिक्षक रवी दौलतराव माने (३०, रा. शिंगोली) हे बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये जादा तास घेत होते. यावेळी सचिन लाकाळ अविनाश लाकाळ हे दोघे वर्गासमोर आले. त्यांनी शिक्षक माने यांना "तू बाहेर ये, नाही तर आम्ही वर्गात येतो' असे म्हणून धमकावले. यावेळी माने यांनी तास सुरू आहे, तास संपल्यानंतर भेटू असे म्हटल्यावर वरील दोघांनी वर्गात जाऊन माने यांना धरून वर्गाबाहेर समोरच्या मोकळ्या मैदानात आणले. तेथे उमेश कोकणे, मोहमद (पूर्ण नाव माहिती नाही) इतर तिघे हजर होते. यावेळी सर्वांनी मिळून "आम्ही शाळेत आल्यावर का अडवितो, आम्ही मुलींना छेडतो, तुला काय करायचे' असे म्हणून जुन्या वादाची कुरापत काढून माने यांना चैन, केबल वायर, स्टीक, काठी लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर शिक्षक मदतीला आल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. माने यांना जबर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या जबाबावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...