आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये शिक्षिकेचा शिक्षण विभागातच आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मूळ ठिकाणी पुन्हा नियुक्ती देण्यात येत नसल्याने अंबाजोगाई येथील प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगीता बंकटराव चाटे (४०) यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सोमवारी दुपारी बारा वाजता विष प्राशन केले. शिक्षिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अंबाजोगाई येथील प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगीता चाटे या जिल्हा परिषद कन्या शाळेत कार्यरत असताना त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०१४ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी त्यांना निलंबित केले होते. निलंबनानंतर काही महिन्यांनी त्यांची अंबाजोगाई येथील मूळ पदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर अंबाजोगाई येथून माजलगाव येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात चाटे यांची बदली करण्यात आली. माजलगाव येथे जागाच रिक्त नसल्याने मूळ जागेवर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्याकडून कुठल्याच हालचाली झाल्या नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. परंतु न्यायालयाने जैसे थे आदेश दिले. त्यातच मागील सात महिन्यांपासून वेतन नसल्याने त्या हतबल झाल्या होत्या.

सोमवारी दुपारी संगीता चाटे या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या. सोबत आणलेली कीटकनाशकाची बाटली त्यांनी पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार करण्यात येत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच वस्तीशाळा शिक्षक हिरामण भंडाने यांनी वेतनाअभावी बीड शहरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी हा प्रकार घडला.

सीईओंनी दिली भेट
याप्रकाराची माहिती मिळाल्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन शिक्षिका चाटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नवीन संचमान्यतेनुसार बदली करण्यात येईल, असे आश्वासन ननावरे यांनी दिले.