आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी सांडपाण्यावर जोपासले ‘ऑक्सिजन पार्क’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - एखाद्या शिक्षकाने वर्ग-शाळांसाठी नवीन उपक्रम राबवणे सर्वश्रुत आहे, पण इथे शाळेचे वैभव वाढवण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतात. शाळेच्या प्रवेशद्वारात गेले की, नजरेला स्पशरून जातो, तो प्राणवायूची उत्पादक क्षमता वाढवणारा ‘ऑक्सिजन पार्क’. शेलगाव (जि. जालना) येथील जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षकांनी ऐन दुष्काळात झाडे जगवली आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांशी एकरूप होता आले तर ‘ऑक्सिजन पार्क’सारखी नवनिर्मिती वाखाणण्याजोगी ठरेल.

जानेवारी ते जून 2013 या दरम्यान जालना जिल्ह्याला दुष्काळाची झळ बसली. परतूर तालुक्यातील शेलगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या. असाच काहीसा, पण वेगळा प्रयत्न शेलगाव येथील शिक्षकांनी केला. जानेवारीत शाळेतील बोअरचे पाणी संपल्यानंतर झाडं सुकायला लागली. शिक्षकांनी सांडपाण्यावर बाग जगवण्याची संकल्पना मांडून विद्यार्थ्यांच्या घरचे सांडपाणी जमा करण्याचे निश्चित झाले. केवळ सांडपाण्याचीच अट आणि कोणत्या झाडाला किती पाणी टाकायचे व पाण्याची नोंद घेण्यासाठी इयत्ता पाचवीच्या 30 विद्यार्थ्यांची गटप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. 28 मार्च 2013 रोजी प्रत्यक्ष सांडपाणी संकलित करावयाच्या वॉटर बँकेचा शुभारंभ झाला. पाणी बचतीचा संदेश आणि वृक्षांच्या रूपाने अनमोल संपत्ती जमा झाली आहे. सर्वांना आदर्श ठरेल असाच हा उपक्रम आहे.


पाणी बचतीचा संदेश
पहिल्याच दिवशी 70 विद्यार्थ्यांनी आणलेले 200 लिटर पाणी वॉटर बँकेत जमा करून नंतर झाडांना टाकण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे, असा संदेश अनाहूतपणे घराघरांत गेला. विद्यार्थ्यांनी बाजेवर बसून स्नान केले आणि तेच पाणी शाळेच्या वॉटर बँकेत जमा केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दर आठवड्यात सर्वात जास्त सांडपाणी संकलित केले त्या विद्यार्थ्यांचा शालेय परिपाठामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.


प्रत्यक्ष कृतीतून मूल्य रुजवले
आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून शाळेच्या परिसरात झाडे जगवण्याचा निश्चय केला. विद्यार्थ्यांच्या मदतीने भर दुष्काळात सांडपाण्यावर झाडे जगवली. आज ऑक्सिजन पार्क आणि झाडे बहरली आहेत. सर्वांनीच प्रत्यक्ष कृतीतून मूल्य रुजवले आहेत. विजय वायाळ, शिक्षक, शेलगाव


वृक्षांची ओळख व्हावी
दुष्काळात झाडे जगवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला. आपल्याकडे विविध प्रकारचे वृक्ष असून सर्वच झाडांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, पण आपल्याला मात्र त्यांची माहिती नसते. तुळशीलाही अत्यंत महत्त्वाचे स्थान असून तुळस आणि ऑक्सिजनचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, म्हणून ‘ऑक्सिजन पार्क’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व कळेल. रंगनाथ खेडेकर, मुख्याध्यापक, शेलगाव