आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयोगशाळेने अवघड गणित केले सोपे; हजारो विद्यार्थ्यांना लाभ; साकारली स्वनिर्मित प्रयोगशाळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम- येथील गुरू देवदत्त हायस्कूलमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दैनंदिन जीवनात वापरातील साहित्याचा वापर करून गणित प्रयोगशाळा साकारली आहे. शिक्षकाने साकारलेल्या या प्रयोगशाळेत जिल्ह्यासह मराठवाड्यातून गणित प्रेमींची गर्दी होत असून आतापर्यंत २० हजार विद्यार्थ्यांसह ५०० शिक्षकांना याचा फायदा झाला आहे.     


राज्यात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर शासकीय निधीचा खर्च होत आहे. अशावेळी भूम शहरातील श्री गुरू देवदत्त हायस्कूलचे गणित शिक्षक सी. एल. तांबे यांनी कल्पकतेतून उभारलेली गणित प्रयोगशाळा चर्चेची ठरली आहे. विद्यार्थ्यांना ‘आउट ऑफ बॉक्स’विचार करायला प्रवृत्त करते. त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकतेला आव्हान देते. यामुळे गणिताची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची गोडी निर्माण होण्यास मदत झाल्याचे तांबे सांगतात. शिक्षणाधिकारी (मा.) औदुंबर उकिरडे यांनी काही दिवसांपूर्वी श्री गुरू देवदत्त हायस्कलूची मॉडेल स्कूल म्हणून निवड केली आहे. आजपर्यंत सर्वांनी विज्ञानाची प्रयोगशाळा पाहिली परंतु गणिताची प्रयोगशाळा हा उपक्रम अनोखा आहे.   


कंटाळवाणे गणित झाले मनोरंजक

 या प्रयोगशाळेत अवघड वाटणाऱ्या संकल्पना, प्रमेय विषय शिक्षक व विद्यार्थ्यांना सहज स्पष्ट होतात. शिक्षणापासून वंचित कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला अवघड गणित यातून सोपे वाटते. अवघड व कंटाळवाणा वाटणारा गणित विषय कसा मनोरंजक होऊ शकतो, हे या प्रयोगशाळेत बघायला मिळते. पायथागोरस प्रमेयाच्या प्रतिकृतीही येथे बघायला मिळतात. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून पारंपरिक अध्यापन पद्धत बाजूला सारून प्रत्यक्ष कृतियुक्त अध्यापनावर भर दिला आहे. रंगीत पेपर वर्कच्या मदतीने भूमितीच्या संकल्पना तांबे यांनी सहज केल्या आहेत.

 

शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवले प्रयोग साहित्य

या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व साहित्य शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केले आहे. कागद, काडीपेटी, चहाचे कागदी कप, लाकडी चमचे, कंपासमधील वस्तू, असे सहज व कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून स्वनिर्मितीवर भर दिला आहे.    

उस्मानाबादसह परजिल्ह्यांतील शाळांची सतत भेट   

 

उस्मानाबादसह बीड व सोलापूर जिल्ह्यातील ४० शाळांनी येथील गणित प्रयोग शाळेला भेट दिली. नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, विषय शिक्षक भेट देऊन त्यांच्या शाळेत अशी प्रयोगशाळा तयार करत आहेत. त्यामुळे भविष्यात गणित प्रयोगशाळांचा जिल्हा म्हणून उस्मानाबादचे नाव राज्यभर पोहाेचेल, असा आशावाद काही शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे, असे या प्रयोगशाळेचे जनक तांबे यांनी सांगितले.    

 

 

विद्यार्थ्यांना लागली गणिताची गोडी     
गणित प्रयोगशाळेच्या माध्यमातून गुरू देवदत्त हायस्कूलची कीर्ती दूरवर पोहाेचली आहे. या प्रयोगशाळेमुळे अवघड वाटणारा गणित विषय विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झाला आहे.  
- औदुंबर उकिरडे, मा. शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद.    

 

दूरवर पोहाेचली कीर्ती    
आमच्या शाळेतील गणित प्रयोगशाळा बघण्यासाठी दररोज दूरवरून अनेक शाळा येतात. अभिनव उपक्रमामुळे शाळेचे नाव दूरवर पोहाेचले असून नावलौकिक प्राप्त झाला आहे.  
- ए. के. गायकवाड, मुख्याध्यापक.

 

अध्ययन प्रक्रिया सुलभ करणार   
या गणित प्रयाेगशाळेत भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ करणार आहे.  
- सी. एल. तांबे, गणित शिक्षक, भूम.   

बातम्या आणखी आहेत...