आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षे मोफत शिकवा, पाच शिक्षकांना कोर्टाकडून शिक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- संस्थाचालकाची बदनामी केल्याच्या आरोपावरून परळी येथील पाच शिक्षकांना बाल सुधारगृहात दोन वर्षे मोफत शिकवण्याची अनोखी शिक्षा अंबाजोगाई न्यायालयाने सुनावली आहे. मुंबईच्या प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे परळीत मिलिंद विद्यालय व महाविद्यालय आहे. कॉलेजमधील संगमनाथ सातानुरे, बालासाहेब साळवे, बालासाहेब फड, मिर्झा बेग, हरिचरण धिरबसी या शिक्षकांनी संस्थाचालक अ‍ॅड. अनंत जगतकर यांची बदनामी चालवली होती.
नियुक्तीसाठी ते पैशाची मागणी करतात, शाळेचे बांधकामच केलेले नाही, शाळा स्थलांतरित करण्याचा संस्थाचालकांचा डाव आहे, असे आरोप त्यांनी सुरू केले. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणही केले. यावरून संस्थेच्या वतीने या पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. हमीपत्रही लिहून घेण्यात आले. तरीही शिक्षकांनी बदनामी करणे सुरूच ठेवले. अखेर 2004 मध्ये अ‍ॅड. जगतकर यांनी या शिक्षकांविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला गुदरला. न्यायाधीश आर. आर. मावतवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीअंती पाचही शिक्षकांना सबळ पुराव्याधारे दोषी ठरवण्यात आले.
अशी आहे शिक्षा
-जिल्हा परिवीक्षाधीन अधिका-यांशी संपर्क साधून प्रत्येक महिन्यातील दोन रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुधारगृहात मुलांना शिकवण्याचे काम करावे. सलग दोन वर्षे स्वखर्चाने हे काम करावे. यासाठी मानधन, भत्ता वा प्रवासखर्च दिला जाणार नाही.
-प्रत्येक 10 हजार दंड आणि न्यायालयीन खर्चासाठी चार हजार असे चौदा हजार रुपये अ‍ॅड. जगतकर यांना द्यावेत. वाईट संगत, व्यसन, वाममार्गापासून दूर राहावे, शांतता, कायद्याचा भंग होणार नाही, याची काळजीही घ्यावी
अपप्रवृत्तींना जरब बसेल- पत्रकबाज शिक्षकांना झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. यामुळे शिक्षकांतील अपप्रवृत्तींना जरब बसेल. शिक्षकांना रीतसर समाजसेवा म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे व त्याच्या नोंदीही ठेवायच्या आहेत.’- अ‍ॅड. आर. डी. कदम, फिर्यादीचे वकील
निकालाचे स्वागत -शिक्षण क्षेत्राची बदनामी करणा-या शिक्षकांना न्यायालयाने समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली. संस्थेची नाहक बदनामी करणा-यांना अटकाव होणार आहे. आम्ही या निकालाचे स्वागत करतो.- अ‍ॅड.अनंत जगतकर, अध्यक्ष, प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी, मुंबई