आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुणी-भांडी करणाऱ्या ‘तेजस्विनी’ला दहावीत 98 टक्के, परीक्षेच्या काळातही केले काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ‘ती’ दोन महिन्यांची असतानाच तिच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. आजी-आजोबांच्या मदतीने आईने चार घरची धुणी-भांडी करीत तिला लहानाचं मोठं केलं. मुलीने खूप शिकावं अन् मोठ्ठं व्हावं हे त्या अशिक्षित आईचं स्वप्न. मात्र शाळेची फी, वह्या-पुस्तकांचा आणि शिकवणीचा खर्च धुण्या-भांड्याच्या कमाईत न झेपणारा. या वेळी मदतीला धावून आली तिची शाळा. तिनेही मग जिद्द केली. आईबरोबर काम करीत दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के मिळवत ‘तेजस्विनी’ हे नाव सार्थक केले.
 
ही गोष्ट आहे तेजस्विनी तरटे या मुलीची. ती सुरू होते तिचं वय दोन महिन्याचं असल्यापासून. तिच्या मोलमजुरी करणाऱ्या वडिलांचं त्यावेळी रक्ताच्या कर्करोगानं निधन झालं अन् तेजस्विनीचं पितृछत्र हरवलं. तिच्या आईनं मोठी मुलगी वैशाली अन् तेजस्विनीचा सांभाळ करण्याचा निर्धार केला. त्यासाठी चार घरची धुणी-भांडी सुरू केली. त्यातून मिळणाऱ्या कमाईत दोन्ही मुलींचं शिक्षण सुरू झालं. आजी-आजोबांचा आधार होताच. मुलींनी खूप शिकावं अन् मोठ्ठं व्हावं हे स्वप्न उराशी बाळगलेल्या त्या अशिक्षित आईनं मुलींच्या मनात ही जिद्द पेरली. मोठी मुलगी वैशालीने दहावीत ९० टक्के गुण मिळवले. त्यामुळे साहजिकच तिच्यापेक्षा लहान असलेल्या तेजस्विनीकडूनही अपेक्षा वाढल्या. तिनेही त्या पूर्ण केल्या.
 
परीक्षेच्या काळातही काम  
वैशाली आणि तेजस्विनी या दोघी बहिणीही आईला मदत करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून प्रपंच भागवतानाच शिक्षणाचा खर्चही उचलला जायचा. एवढेच नव्हे तर परीक्षा सुरू असतानाही वैशाली आणि तेजस्विनी या बहिणी दोन घरचे काम करायच्या.

दोघी बहिणींना आहे मदतीची गरज  
अार्थिक परिस्थिती बिकट असलेल्या तेजस्विनीच्या या यशाने काही प्रश्नही निर्माण केले आहेत. चांगल्या महाविद्यालयात ११ वीला प्रवेश मिळाला तरी पुढचे शिक्षण कसे पूर्ण करायचे? हा प्रश्न आहेच. मोठी बहीण वैशाली यावर्षी १२ वीला आहे. तेजस्विनी ११ वीला जाणार. दोघीही हुशार आहेत. मात्र अार्थिक लढा देण्याची कुवत नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...