आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीचा पारा घसरला ९.८ अंशांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - या वर्षी लवकर दाखल झालेल्या गुलाबी थंडीने परभणीला नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात चांगलेच गारठले आहे. सोमवारी (दि.२१) सर्वात कमी तापमानाची म्हणजेच ८.८ अंश सेल्सियस इतकी नोंद झाल्याने ही थंडी बोचरी ठरू लागली आहे. मंगळवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजता हे तापमान ९.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले.

दरम्यान, येत्या चार दिवसांत या तापमानात थोड्या प्रमाणात वाढ होऊन ते ११ ते १२ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला असून सध्याची थंडी ही पिकांसाठी पोषक असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यात मागील सहा वर्षांत थंडी ही नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होत होती. मात्र, यंदा दसऱ्यापर्यंत झालेल्या पावसाने थंडीचे आगमन लवकर झाले. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी जाणवणारी थंडी पंधराच दिवसांत बोचरी झाली. गेल्या चार दिवसांपासून चांगलाच गारठा झोंबू लागल्याने दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. सकाळी उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडणे मुश्कील झाले असून सायंकाळी साडेपाच वाजेपासूनच अंधार पडून थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी तापमान सर्वात कमी नोंदले गेल्यानंतर मंगळवारी किमान तापमान ९.८, तर दुपारी तीनपर्यंतचे कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सियस नोंदले गेले. येत्या चार दिवसांत तापमान वाढणार असल्याने थंडीचे प्रमाण कमी होणार असले तरी त्यानंतर पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

पिकांसाठी पोषक वातावरण
सध्याचे थंडीचे प्रमाण हे तुरीसाठी व पेरणी करण्यात येत असलेल्या गव्हासाठी पोषक आहे. थंडी असली तरी धुके नाही, अन्यथा धुक्याचा परिणाम गव्हाच्या उगवण क्षमतेवर होतो. सध्याच्या वातावरणात पेरणी योग्य आहे. तुरीसाठीही दाट धुके पडल्यास अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. धुके नसल्याने तुरीसाठी वातावरण पोषक आहे. - ए. आर. शेख, वेधशाळा निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...