आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये उन्हाचा पारा ४० अंशांवर, नांदेड, लातूरमध्येही तळपला सूर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी गारांचा मारा अनुभवलेल्या जिल्हावासीयांच्या सोमवारी दुपारी घामाच्या धारा वाहिल्या. जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहोचल्याने लाहीलाही झाली.

मागील आठवड्यात नऊ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव, धारूर, आष्टी या तालुक्यांना गारपिटीने झोडपून काढले. टरबूज, खरबूज, अांबा, द्राक्षे, डाळिंब, पपई या फळबागा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गारपिटीचे पंचनामे सुरू झाले आहेत. अवकाळी पावसामुळे ११ एप्रिलला तापमान २२ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. बीडकरांना सूर्यदर्शनही झाले नव्हते. आठ दिवसांत पाऊस थांबताच रखरखते ऊन पडू लागले आहे. याचा जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. सोमवारी बीडचे तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.

नांदेड ३९.१ से.
नांदेड | वादळी पाऊस, गारपिटीनंतर आता कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली. रविवारी तापमानाचा पारा शहरात ४०.२ से पर्यंत वर सरकला. या मोसमातील हे सर्वोच्च तापमान आहे. सोमवारी मात्र तापमानात थोडी घट होऊन कमाल तापमानाचा पारा ३९.१ से. स्थिर राहिला. शहरात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.

लातूरही ३९ अंशांपर्यंत
लातूर | गेल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे वातावरणात थंडावा आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा उन्हाची काहिली वाढली असून रविवारी आणि सोमवारी अनुक्रमे ३८ व ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात साधारण मे महिन्यात तापमान उच्चांक गाठते. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशापर्यंत जातो.