आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरासाठी जमा झालेला निधी जलयुक्त शिवार अभियानाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - आपल्या देशातील जनमानसावर धर्माचा एवढा पगडा बसला आहे की, त्यासाठी ते जीव द्यायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. धर्माला अफूची गोळी, असेही म्हटले जाते. लोकप्रतिनिधीही आडमार्गाने अशा कामासाठी स्थानिक विकास निधीतील पैसा देऊन गावकर्‍यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु देगलूर तालुक्यातील करडखेड या गावाने एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. महादेव मंदिर बांधकामासाठी गोळा झालेला एक लाख रुपयांचा निधी गावकर्‍यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी दिला आहे.

देगलूरपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेले करडखेड हे गाव तसे धार्मिक प्रवृत्तीचे. गावात नेहमी धार्मिक कार्यक्रमांचा रतीब चालू असतो. गावात मोठा हरिनाम सप्ताह घ्यावा, असा निर्णय गावकर्‍यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी घेतला. तसेच गावात महादेव मंदिर बांधकामाचा संकल्पही सोडला. या धार्मिक कामासाठी गावकर्‍यांनी पुढे येत एक लाख रुपयांचा निधी जमा केला. हा कार्यक्रम उन्हाळा कमी झाला आणि पाणीटंचाईची झळ कमी झाली की घ्यावा, असा विचार सुरू होता.

जलयुक्त शिवार अभियानाने विचार बदलला : याच वेळी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू झाली. त्यात करडखेड येथे नाला सरळीकरणाचेही काम सुरू होते. या कामासाठी भरपूर निधी लागणार होता. शासनाकडून आलेला निधी कामाच्या दृष्टीने तोकडा होता. त्याच वेळी गावातील कैलास येसगे, शहाजीराव देशमुख, गाजले गुरुजी, गणेश महाजन, विनोद कुलकर्णी, दीपक मोघे, पंकज देशमुख, बालाजी इबितवार, किसन पांचाळ, नीळकंठ देशमुख या लोकांनी पुढाकार घेऊन मंदिरासाठी जमा झालेला निधी नाला सरळीकरणाच्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतला.

गावकर्‍यांनीही या विकासोन्मुख कामासाठी निधी देण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यानुसार सहायक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तहसीलदार जिवराज दापकर यांच्या हस्ते हा निधी नाला सरळीकरणाचे काम करणार्‍या बलराम ग्रुप आॅफ फार्मर्सला देण्यात आला. गुरुवारी या निधीचे हस्तांतरण करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी बिनवडे यांनी मंदिराच्या कामासाठी जमा झालेला निधी नाला सरळीकरणाच्या कामाला देऊन गावकर्‍यांनी एक नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल गावकर्‍यांचे अभिनंदन केले. या कामासाठी शासकीय निधीतही वाढ करण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. धार्मिक कामापेक्षाही विकासाला महत्त्व देण्याची गरज असल्याचे करडखेडवासीयांनी या कृतीतून दाखवून दिले.
बातम्या आणखी आहेत...