आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: शनीसह बुध, शुक्र ग्रहांची मंदिरे चौदा तास पुराच्या पाण्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे गाेदावरी नदीला  पूर आल्याने रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी आठ अशी चौदा तास शनीसह बुध व शुक्र ग्रहांची मंदिरे पुराच्या पाण्यात होती. सोमवारी पूर ओसरल्यानंतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. तब्बल दहा वर्षांनंतर या मंदिरांना गोदावरीच्या पाण्याने वेढले.  
 
गेवराई तालुक्यात शनिवार, रविवार  या दोन दिवशी झालेल्या दमदार  पावसाने तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहू लागले. तालुक्यातील हिरडपुरी येथील बंधारा वाहू लागल्याने गोदावरी नदीला पूर आला. हळूहळू पुराचे पाणी  राक्षसभुवन येथील नदीपात्रातील शनिमंदिराकडे सरकू लागले. सायंकाळी सहा वाजता  शनिमंदिराला  पुराच्या पाण्याने वेढले. पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी चार वाजताच शनिमंदिर बंद करण्यात आले होते. गोदावरीच्या पुराचे पाणी थेट शनिमंदिर परिसरातील  मंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत गेले.  सोमवारी सकाळी सहा  वाजेपासून गोदावरीच्या पुराचे पाणी ओसरण्यास  सुरुवात झाली. सकाळी आठ वाजता पूर ओसरला. त्यानंतरच भाविकांसाठी शनिमंदिर खुले करण्यात आले.  
 
दत्त मंदिरालाही पाण्याने वेढले
२१ ऑगस्ट रोजी चौथ्या श्रावणी सोमवारीच पोळा व पिठोरी अमावास्या आल्याने पहाटेच भाविकांनी शनीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. परंतु  सकाळी आठ वाजेपर्यंत पुराचे पाणीच ओसरले नव्हते. २००६ नंतर पहिल्यांदाच शनीसह इतर देवतांच्या मंदिरांना पुराने वेढले. पांचाळेश्वर येथील जागृत असलेले दत्त मंदिरही पुराच्या पाण्यात गेले होते.  
 
पहाडी पारगाव नदीत तरुणाचा मृत्यू
धारूर - पहाडी दहिफळ येथे बांधकामावर गेलेला मजूर गावाकडे परतत असताना पहाडी पारगाव येथील नदीत वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शेख आरेफ शेख फारुख (२०, रा. धारूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.  दमदार पावसाने नदीनाल्यांना पूर आला आहे. धारूर येथील शेख आरेफ हा तरुण पहाडी दहिफळ येथे बांधकामावर मजुरीसाठी गेला होता.
 
२ गावे संपर्काबाहेर; २ तलाव फुटले
बीड- धारूर तालुक्यात सोमवारी खारी नदीला आलेल्या पुरामुळे चिंचपूर व गांजपूर या  दोन गावांचा सहा तास संपर्क तुटला. पुरामुळे येथील पूलही खचला आहे. आष्टी तालुक्यात  खरडगव्हाण येथील तलाव भरल्यांनतर फुटल्याने तूर, कापूस या पिकाबरोबरच कांद्याचे रोप वाहून गेले आहे. तर  नांदूर येथील पाझर तलाव क्रमांक चार फुटल्याने मोठे नुकसान झाले.
 
बातम्या आणखी आहेत...