आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी युवकाच्या मृत्यूनंतर परभणीत तणाव, व्यापार पेठेत कडकडीत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - गंगाखेड शहरातील दि.१५ रोजी झालेल्या मारहाण प्रकरणातील जखमी सिद्धार्थ गायकवाड (२३) या युवकाचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मंगळवारी (दि.२३) मृत्यू झाला.  ही घटना कळताच बुधवारी (दि.२४) व्यापार पेठेत कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. दुपारी तीन वाजता सिद्धार्थ गायकवाड याचे पार्थिव येताच जमावाची दगडफेक सुरू झाली. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले व पोलिस व्हॅनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  
 
गंगाखेडमध्ये १५ मे रोजी सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून बसस्थानक परिसरातील हॉटेलसमोर सिद्धार्थ आदिनाथ गायकवाड व त्याचा मित्र थांबला असताना जैनदीपुरा येथील अकरा जणांनी अचानक येऊन हातातील लोखंडी रॉड व कत्तीने मारहाण केली. यात सिद्धार्थ गायकवाड याच्या डोक्याला मार लागला त्यात तो गंभीर जखमी झाला असता त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथून औरंगाबाद येथे पाठवण्यात आले.  याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात प्रवीण प्रल्हाद साळवे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर दि. १७ रोजी गुन्हा दाखल झाला होता.  घटना होऊन आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याप्रकरणी तीव्र नाराजी होती. त्यातच सिद्धार्थ गायकवाड याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याचे कळताच आंबेडकरनगरातील नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी कडकडीत बंद ठेवण्याचे ठरवले.

त्यामुळे पोलिसांनी चार आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. त्यात  अमीर खान सरदार खान, शेख माजिद शेख पाशा, शेख मोबीन शेख मनसब ऊर्फ मुन्ना, शेख अलियास शेख छोटू या चौघांचा समावेश आहे.  उर्वरित सात आरोपी फरार आहेत. दरम्यान, परभणीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी कांबळे, रेड्डी आदींनी प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले. पानसरे यांनी शिरगावकर व चौरे यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे व आरोपींना अटक करण्याचे लेखी आश्वासन देऊन जमावास शांत करत मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला.  
 
अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून रोष: पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस दादाहरी चौरे यांच्यावर  अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत समाजबांधवांनी तीव्र रोष व्यक्त केला.  सिद्धार्थ गायकवाड याचा मृतदेह  पोलिस ठाण्यात येताच बाहेर जमलेल्या समाजबांधवांनी नारेबाजी केली.
 
बातम्या आणखी आहेत...