आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Examination : No Question Paper Get Students

दहावीची परीक्षा : प्रश्नपत्रिकाच न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - दहावी बोर्डाच्या परीक्षेत उमरगा येथील भारत विद्यालय केंद्रावरील 219 विद्यार्थ्यांना संयुक्त हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकाच न मिळाल्याने गोंधळ उडाला. हा प्रकार मंगळवारी घडला. तब्बल दीड तासानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंगळवारी 10 वीचा संयुक्त हिंदीचा पेपर होता. भारत विद्यालय, उमरगा या केंद्रावर सकाळी 11 ते 1 दरम्यान हा पेपर सुरू होणार होता. दरम्यान, गटशिक्षण कार्यालयाकडून 10.30 वाजता प्रश्नपत्रिकांचे संच आणण्यात आले. या केंद्रावर एकूण 219 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. केंद्रप्रमुख आर.व्ही. गायकवाड यांनी प्रश्नपत्रिका तपासून पाहिल्या असता संयुक्त हिंदी विषयाच्या फक्त 20 प्रश्नपत्रिका आढळल्या. इतर 199 प्रश्नपत्रिका दुस-या विषयाच्या म्हणजे हिंदी पेपरच्या आढळल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधून संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिका कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर गटशिक्षणाधिका-यांनी शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे यांना फोनवरून या प्रकारची माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार इतर केंद्रांवरून 99 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून व 100 प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्यात आली. दीड तासानंतर 12.30 वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या व 2.30 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. दरम्यान, केंद्रावर एकच गोंधळ उडाला. संबंधित अधिका-यांची या वेळी पळापळ चालू होती. विद्यार्थी मात्र परीक्षा होणार की नाही या संभ्रमात होते. या प्रकरणी वरिष्ठांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

गटशिक्षणाधिका-यांची दंडेली
घडल्या प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांना माहिती विचारण्यासाठी काही पत्रकार गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. या वेळी त्यांनी माहिती दडवण्याचा प्रयत्न करून, मला जास्त प्रश्न विचारल्यास पोलिसांत तक्रार करीन, म्हणत पोलिसांना कार्यालयात बोलावून घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
ही आमची नव्हे तर शिक्षण मंडळाची चूक आहे. तेथूनच कोड बदलून आला होता. त्यामुळे संयुक्त हिंदी प्रश्नपत्रिकेच्या ठिकाणी हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिका आल्या.
सुधा साळुंके, गटशिक्षणाधिकारी, उमरगा

कारवाई करणार
तांत्रिक चुका होत असतात. तहसीलदार व पोलिसांच्या सुरक्षेमध्ये गोपनीयतेने प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढले. शिक्षण मंडळाने नेमलेल्या संबंधित प्रेसवर कारवाई करण्यात येईल.’’
दिलीप सहस्रबुद्धे , अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर