आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या 'टेरर हब'ची अजूनही धास्ती; गुप्तचरांची कायम नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक पोलिसांपासून 'एनआयए'पर्यंत सर्वांची नजर असलेल्या बीडमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क आज जरी गोठले असल्याचे दिसत असले तरी भविष्यात देशातील विघातक कारवायांत 'बीड मॉड्यूल' सक्रिय होऊ शकते याची भीती पोलिस आणि गुप्तचरांना वाटते. जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल प्रकरणामुळे गेल्या सहा वर्षांत बीडमधील अनेक वसाहती सुरक्षा यंत्रणांच्या कडक निगराणीखाली आहेत. कुठल्याही घटनेत 'बीड कनेक्शन' आले की 'आता काय होईल?' या भीतीने या मोहल्ल्यांत धास्तीचे वातावरण पाहायला मिळते.
बीड एव्हाना 'टेरर हब' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. घातपाती कारवाया करणार्‍यांनी त्यांना लागणारे मनुष्यबळ अशा छोट्या शहरांतून उभे केले आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर हे प्रयत्न अधिक जोमाने झाले. त्यातूनच बीडचा 'टेरर हब' म्हणून उदय झाला. वेरूळ घाटात 9 मे 2006 रोजी स्फोटकांचा साठा सापडला नसता तर हे नेटवर्क कदाचित अजूनही उघडकीस आले नसते. बीडच्या हत्तीखाना गल्लीपासून लष्कर- ए- तोयबाच्या पाकिस्तानातील मुरिदके येथील हेडक्वार्टरपर्यंत या नेटवर्कची मजल गेली यातच सारे आले.
वेरूळ घाटात शस्त्रसाठा पकडल्यानंतर जबी आणि फय्याज फरार झाले. त्यांच्या बीडमधील साथीदारांनाही उचलण्यात आले. पोलिसी कारवाईच्या धास्तीने मग जे कधी तरी जबीच्या संपर्कात आले होते असे तरुणही बीड सोडून गायब झाले. ते नंतर वातावरण थोडेसे शांत झाल्यावर परतले. त्यांनी नंतर आपला रस्ता बदलला.
आज काय आहे स्थिती?- जबिउद्दीन अन्सारी आणि फय्याज कागजीबद्दल आज कुणी मोकळेपणाने बोलायला धजावत नाही. एटीएस, स्थानिक पोलिस, सीआयडी, आयबी, एनआयए असा सगळय़ांचा वॉच असल्याने कशाला झेंगट मागे लावून घ्या? या विचारातून लोक गप्प आहेत. विषय काढला तरी तो टाळला जातो. समाजातील धुरिणांनी ज्या वेळी लक्ष ठेवायला हवे होते तेव्हा ते केले नाही याची कबुली मात्र अनेक जण देतात. त्या युवकांविषयी काहीच माहिती नसल्याचे परिसरातील नागरिक खासगीत सांगतात. पण त्यांना खरोखरच काही माहिती नाही की पोलिसांवर अविश्वास असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ होतेय, हे कोडे सहा वर्षांनंतरही तपास यंत्रणेला उलगडलेले नाही. गुन्हे करणारे मोजकेच आहेत, पण सगळय़ांकडेच संशयाने पाहिले जाते हे अधिक घातक आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
जबी फरार झाला आणि बीडमधील वातावरण बदलले. पोलिसांच्या आणि गुप्तचरांच्या गल्लोगल्लीत फेर्‍या वाढल्या. नजर ठेवण्यात येऊ लागली. लोकांचा एकमेकांकडे बघण्याचाही दृष्टिकोन बदलला. राज्यात, देशात कुठे काही घटना घडली की बीड सतर्क होते. बीडचे काही कनेक्शन निघाले तर पुन्हा पोलिसांच्या फेर्‍या आणि अटकसत्र यांची त्यांना भीती वाटते.
पाप मुलांचे, शिक्षा पालकांना- जबिउद्दीन अन्सारी आणि फय्याज कागजी यांच्यासह फरार साथीदारांचे पालक आजही बीडमध्ये राहतात. मात्र, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एका रात्रीत बदलला. जबीचे म्हातारे आई-वडील कसेबसे जीवन कंठत आहेत. त्यांना आणि इतर पालकांना समाजाने जणू काही वाळीतच टाकले आहे. राजकारणात आपणच मुस्लिमांचे पुढारी असल्याचे दाखवणारे नेते संकटकाळात आमच्या मदतीला आले नाहीत, अशी या पालकांची खंत आहे.
'एमएच 23'वर देशभरात करडी नजर- जबी, फय्याजच्या कारनाम्यांमुळे बीडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम झाले आहे. त्याची खंत येथील मुस्लिम नागरिकांनाही जाणवते. बीड हे अतिरेकी कारवायांचे हब झाल्याच्या संशयावरून आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही प्रत्येक बीडकरास संशयाच्या नजरेतून पाहिले जाते याचा अनुभव काही लोकांना आला. नुकत्याच आग्रा येथे पर्यटनासाठी गेलेल्या काही बीडकरांना केवळ त्यांच्या गाडीच्या क्रमांकावरून (एमएच 23) पोलिसांच्या झाडाझडतीचा त्रास सहन करावा लागला.
सरकारनेच पुढाकार घ्यावा- जबिउद्दीन प्रकरणानंतर असे प्रकार का घडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापेक्षाही तरुणांनी अशा मार्गाने जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यक्तिगत पातळीवर काही जण जरूर प्रयत्न करतात, पण सरकारनेच पुढाकार घेऊन असे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. - महंमद इलियास फाजील, प्राचार्य, मिलिया कॉलेज
सूत्रधारांचा शोध घ्यायला हवा- जबिउद्दीनला तयार करणारे कोण आहेत याचा शोध लागणे आवश्यक आहे. आसाम दंगलीच्या चित्रफिती दाखवून मुलांची डोकी फिरवण्याचे काम पुन्हा सुरू आहे. अशातूनच दहशतवादी कारवाया करणारे घडत असतात याचे भान ठेवायला हवे. - मुकर्रमजान पठाण, सामाजिक कार्यकर्ता
आम्ही लक्ष ठेवून आहोत- 2006 नंतर बीडमधील विघातक कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला पूर्णपणे यश आले आहे. पोलिस यंत्रणेची करडी नजर आणि इतर उपाययोजनांमुळे अशा गटांच्या कारवाया जवळपास थांबल्यातच जमा आहेत. आम्ही डोळय़ांत तेल घालून लक्ष ठेवून आहोत.- दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधीक्षक.