आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस चालकाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- पुसदहून माहूरकडे येणाऱ्या एसटी बसने (एमएच ४० डी ९३७०) रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला अचानक पेट घेतला. चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने बसमधील १०-१२ प्रवाशांचे प्राण वाचले.


पुसद आगाराची बस दुपारी १२ वाजता पुसद स्थानकारून सुटली. दुपारी दीड वाजताच्या सुमाराला माहूर येथे आली. बसस्थानकापासून काही अंतरावर भक्त मंडळाजवळ बस आली असता, अचानक चालकाच्या केबिनमधून धूर येऊ लागला. चालक उद्धव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. त्यानुसार सर्व प्रवासी अवघ्या काही मिनिटांतच खाली उतरले. तोपर्यंत बसच्या केबिनला आगीने आपल्या कवेत घेतले. आजूबाजूच्या युवकांनी तातडीने टँकर आणून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. माहूर येथील अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळ गाठून आग विझविली. तोपर्यंत बसचा अर्धा भाग जळून खाक झाला. रेडीयेटर गरम झाल्याने शाॅर्टसर्किट झाले व त्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. माहूर येथील फोटोग्राफर दिनेश कोंडे यांनी हा थरार स्वत: अनुभवला.
आगीने पाच मिनिटांत उग्र रूप धारण केले. चालकाने सावधानतेचा इशारा दिला नसता तर अघटित घडले असते, अशी प्रतिक्रिया कोंडे यांनी व्यक्त केली.