आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडावर, झाड खांबावर; वीज तारांमुळे आग, दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड तालुक्यातील नेकनूर येथे शुक्रवारी पहाटे पाच वाजता भरधाव मालट्रक झाडावर आदळला. त्यानंतर झाड खांबावर पडून तारांचे घर्षण झाले.  ठिणग्या ट्रकवर पडून आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. - Divya Marathi
बीड तालुक्यातील नेकनूर येथे शुक्रवारी पहाटे पाच वाजता भरधाव मालट्रक झाडावर आदळला. त्यानंतर झाड खांबावर पडून तारांचे घर्षण झाले. ठिणग्या ट्रकवर पडून आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
बीड - चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडावर आदळला. त्यानंतर झाड विजेच्या खांबावर पडल्याने पोल ट्रकवर पडला. या अपघातात विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडून ट्रकने पेट घेतला. या विचित्र अपघातात ट्रकमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ट्रकच्या बाहेर फेकला गेलेला तिसरा गंभीर जखमी झाला असून हा अपघात शुक्रवारी पहाटे पाच वाजता बीड तालुक्यातील नेकनूरजवळ घडला.
हैदराबादहून आंध्र प्रदेशातील कडप्पा शहराकडे अॅल्युमिनियम प्लेट घेऊन निघालेला ट्रक (एपी०४, ९११९) नेकनूरजवळील हॉटेल सिंहगडजवळ आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकला. या जोरदार धडकेत झाड उन्मळून विजेच्या खांबावर पडले व विजेचा प्रवाह असलेल्या तारा जमीनदोस्त झाल्या. तारांचे घर्षण होऊन ठिणग्या ट्रकवर पडल्याने आग लागली. ट्रकमध्ये तिघे जण होते. अपघातात व्यंकटेश प्रसाद तायर (३५, रा. बट्टिपल्ला, आंध्र प्रदेश) हा बाहेर फेकला गेला, तर ट्रकमध्ये अडकून पडल्याने ट्रकचालक चाँद पाशा शेख (३२), व्ही. एम. बाधा (३०, दोघे, रा. कडप्पा, जि. कोंढपेठ आंध्र प्रदेश) यांचा ट्रकमध्ये होरपळून मृत्यू झाला. जखमी व्यंकटेश प्रसाद यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनूर ठाण्याचे पोलिस राजाभाऊ थळकरी, युनूस बागवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
नेकनूर पोलिसांची धाव
नेकनूर ठाण्याचे पोलिस राजाभाऊ थळकरी, युनूस बागवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. एका जखमीस सुरुवातीला नेकनूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यालगत घडलेल्या या विचित्र अपघाताची माहिती मिळाल्यांनतर नागरिकांची गर्दी झाली.
मृतावरच गुन्हा दाखल
या अपघातातील ट्रक चालक मृत चाँद पाशा शेख याने निष्काळजीपणे ट्रक चालवून झाडाला धडक दिल्याने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक ए. एस. भुसारे करत आहेत.