आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी शहराच्या चारही बाजूंना भरणार आठवडी बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शहरातील शनिवारच्या आठवडी बाजारासाठी शनिवार बाजार येथील जागा अपुरी पडत असल्याने यावर पर्याय म्हणून शहराच्या चारही दिशांना महापालिकेच्या जागेवर आठवडी बाजार भरवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून यासाठी जागेच्या उपलब्धतेसह शेतकऱ्यांना तात्पुरते शेड, स्टॉल व ओळखपत्रेही दिली जाणार आहेत.

महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी याबाबतच्या प्रस्तावास संमत करताना महापालिकेच्या खुल्या जागांवर हा आठवडी बाजार भरविण्याचे सांगितले आहे. सभागृह नेते प्रताप देशमुख, नगरसेवक विखार लाला, स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब बुलबुले यांनी या प्रश्नावर पुढाकार घेऊन सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला होता.

राज्य कृषी पणनने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार भरण्यासाठी खंडोबा बाजार येथील जागेची मागणी केली होती. त्यावर नगरसेवक गुलमीरखान यांनी शनिवार बाजार येथे शनिवारी आठवडी बाजार भरण्याऐवजी तो रविवारी भरविण्यात यावा, असे सूचविले होते. मुळातच, शनिवार बाजारची जागा अपुरी पडत असल्याने व वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने खुल्या जागांवर अन्य दोन ते तीन ठिकाणी हा बाजार भरविल्यास नागरिकांनादेखील सोयीस्कर ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सभागृह नेते प्रताप देशमुख यांच्यासह विखारलाला, बाळासाहेब बुलबुले यांनी शहरातील चारही बाजूंनी शेतकऱ्यांना थेट भाजीविक्रीसह ज्वारी, गहू, तांदुळ आदी साहीत्य विक्रीसाठी महापालिकेने जागा देण्याची गरज व्यक्त केली. त्यास सर्व नगरसेवकांनी संमती दिली. या ठिकाणी आठवडी बाजार भरविल्यास ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही सोयीचे ठरणार आहे.

ही चार ठिकाणे...
१) आठवडी बाजारासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये.
२) जुना पेडगाव रोड, कृषी अधीक्षक कार्यालय परिसरात.
३) खंडोबा बाजार, धार रोडवर.
४) जिंतूर रस्त्यावर रायगड कॉर्नरवर.
बातम्या आणखी आहेत...