आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटी कायदा करा, आरक्षणासाठी समाजाचा लातुरात घंटानाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे, मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रणासाठी अॅट्रॉसिटी कायदा व्हावा आदी मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे गुरुवारी येथील गांधी चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मागच्या काळात न्या. राजेंद्र सच्चा, रंगनाथ मिश्रा आणि महेमूद रहेमान समिती स्थापन करण्यात आली होती. या समित्यांनी सखोल अभ्यास करून आरक्षण देण्याची शिफारस केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. देशाचा सर्वांगीण विकास साधताना एका समाजाला बाजूला ठेवून ते कदापिही शक्य नाही, अशीही मुस्लिम समाजाची धारणा आहे.

समाजाचे शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक मागासलेपण दूर होण्यासाठी मागील नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु आश्वासन देऊनही शासनाने मुस्लिम आरक्षणाकडे पाठ दाखवली. त्यामुळे राज्यभर मोर्चे निघत आहेत.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून त्यात आरक्षणासह अन्य मागण्यांचा निर्णय व्हावा म्हणून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समितीचे प्रदेश सचिव मोहसीन खान, शादुल्ला शेख, उस्मान शेख, रियाज शेख, वसीम शेख, गफार मोमीन, वाजिद मणियार, इम्रान शेख, जब्बार बागवान आदी सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...