आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच शहरांची तहान भागवणारे मांजरा धरण 55 टक्के भरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - लातूरसह कळंब, अंबाजोगाई, केज, धारूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगावच्या मांजरा धरणाचा जलसाठा रडतखडत का होईना अखेर ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला या धरणात केवळ २० टक्के पाणी होते. आजवर पाणीसाठ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे.   

लातूर शहर आणि लातूर एमआयडीसी पाणीपुरवठा यंत्रणा मांजरा  धरणावरच अवलंबून आहे. पाच वर्षे सलग अवर्षणामुळे मांजरा धरण दोन वर्षांपूर्वी कोरडेठाक पडले होते. त्यामुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी हे धरण १०० टक्के भरले. एवढेच नव्हे तर त्यातून किमान धरण क्षमतेच्या ५० टक्के पाणी सोडून द्यावे लागले होते. चांगल्या पावसामुळे मांजरा धरण पट्ट्यात उसाची मोठी लागवड झाली. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. बाष्पीभवन आणि पाणीवापर यामुळे धरणातील ७० पाण्याचा व्यय झाला. उन्हाळ्याअखेर या धरणात २३ टक्के पाणी शिल्लक होते.  या वर्षीही चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. गेल्या महिन्यात अधूनमधून पडलेल्या पावसामुळे अखेर रडतखडत का होईना ३५ टक्के पाण्याची आवक होऊन धरणात ५५ टक्के जलसाठा निर्माण झाला.   
 
निम्न तेरणाही ६५ टक्के 
लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे मधल्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे या धरणातील पाणी  शेती सिंचनासाठी सोडण्यात आले होते. पावसाळ्यात पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर झालेल्या पावसाने या धरणात समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला. लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांमध्येही ४० ते ७७ टक्के पाणीसाठा आहे. सर्वाधिक ७७ टक्के पाणी घरणी प्रकल्पात आहे. मात्र अतिवृष्टी होऊनही एकही मध्यम प्रकल्प १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. या महिन्यात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या अनुभवात परतीचा पाऊस चांगला पडला आहे. 
 
तावरजा, मांजरावरील बंधारे तुडुंब भरले
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांवर बांधलेले बंधारे १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे पुढील काळात पाऊस पडला तर कोणत्याही क्षणी या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून त्यातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.  मांजरा नदीवरील बांधण्यात आलेले टाकळगाव देवळा, वांजरखेडा, कारसा पोहरेगाव, साई, खुलगापूर, शिवणी, डोंगरगाव, धनेगाव व होसूर हे ९ उच्च पातळी बंधारे तसेच तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गुंजरगा, तगरखेडा, औराद हे ७ बंधारे तसेच रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळा हे बंधारे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या पुढे होणाऱ्या पावसाचे पाणी बंधाऱ्यांमध्ये साठवणे शक्य नाही. यामुळे यातील पाणी कोणत्याही क्षणी मांजरा, रेणा व तेरणा नदींच्या पात्रात सोडण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...