आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ महिला पोलिसाच्या वैद्यकीय तपासणीचे महासंचालकांचे आदेश; अहवालानंतर निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितलेल्या बीड जिल्हा पोलिस दलातील त्या महिला पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. ४ डिसेंबर रोजी जे जे रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी होणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर लिंगबदल प्रकरणात काय निर्णय घेता येईल याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.     


लिंगबदल शस्त्रक्रियेस पोलिस महासंचालकांनी  परवानगी नाकारल्यानंतर  उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या महिला पोलिसास  न्यायालयाने मॅट कडे दाद मागण्यास सांगितले आहे. 

दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत दुर्मिळ बाब असल्याने त्या महिला पोलिसाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना दिल्या होत्या. यानंतर आता प्रशासकीय पातळीवर सूत्र फिरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी त्या महिला पोलिसाची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही पत्र दिले आहे. रुग्णालयाने ४ डिसेंबर रोजी तपासणी करण्यात येईल, असे सांगितले आहे. यापूर्वीही तिची तपासणी झाली असली तरी ती प्रशासकीय आदेशाने झाली नसल्याने पुन्हा तिला तपासण्यांना सामोरे जावे लागणार आहे. तिच्यातील हार्मोन्सचे बदल, लिंगबदलाची आवश्यकता याबाबतचा अहवाल वैद्यकीय अधिकारी पोलिस महासंचालकांना देणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा याबाबत विचार केला जाईल. 


विशेष बाब म्हणून परवानगी
विशेष बाब म्हणून त्या महिला पोलिसाला लिंगबदल करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे किंवा थेट पोलिस भरती प्रक्रियेतील नियम गृह विभागाकडून बदलून याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

 

उंचीचा अडसर    
त्या महिला पोलिसाच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही तिला सेवेत पुरुष गटात सामावून घेण्यास तिच्या उंचीचा अडसर आहे. पुरुषांसाठी उंचीची अट १६५ सेमी आहे. मात्र तिची उंची १६३ सेमी असल्याने अडचण येऊ शकते

 

एसपींची घेतली भेट   
आतापर्यंत मुंबईत असलेली ती महिला पोलिस मंगळवारी बीडमध्ये दाखल झाली. सकाळी तिने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेतली. वैद्यकीय तपासणीबाबत तिला अधीक्षक जी.श्रीधर यांनी माहिती दिली.    

बातम्या आणखी आहेत...