आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूरच्या होळीची रीतच न्यारी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लेधारूर - देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या त्यागाची आठवण म्हणून होळी गीत गाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देणा-या होळीला किल्लेधारूरमध्ये धूलिवंदनापासून सुरुवात होणार आहे. राजपूत समाजाच्या वतीने अनेक वर्षांपासून साजरी करण्यात येत असलेल्या होळीचे आगळेवेगळे महत्त्व असून, रंगपंचमीपर्यंतच्या पाच दिवसांत रंगांची उधळण करणा-या या होळीवर यंदा दुष्काळाचे सावट आहे.

धारूर शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. ती जोपासण्याचे काम आजही सुरू आहे. या सणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी पाच दिवस गावी मुक्कामी येतात. होळीच्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा करून होळीला अग्नी दिला जातो. ही होळी धूलिवंदनापासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस पेटलेलीच ठेवली जाते. या सणासाठी प्रत्येकाकडे गोड धोड पदार्थ बनवले जातात. होळीच्या दुस-या दिवसापासून म्हणजे धूलिवंदनापासून रंगपंचमीपर्यंत कटघरपु-यापासून हनुमान चौकापर्यंत मुख्य रस्त्याने रोज दुपारी चाचर (सामुदायिक फेरी) काढण्यात येते. या चाचरीत रंगांची उधळण केली जाते. राजपूत बांधव ढोलकी, झांज आदी वाद्याच्या तालावार समाजाची परंपरा सांगणारी गीते गातात. या वेळी दिसेल त्याच्यावर रंगांची उधळण केली जाते. रंग उधळण्याचे काम रोज एका कुटुंबाकडे असते. यात शुक्ला, हजारी, दिख्खत, तिवारी, दुबे, सदरीवाल यांचा समावेश असतो. रात्रीच्या वेळी चाचर काढून त्यात गीतेच गायली जातात. मात्र, त्यावेळी रंगांची उधळण केली जात नाही. सामाजिक एकात्मता मजबूत करण्याचे कामही या सणाच्या माध्यमातून केले जाते. पाचही दिवस दुपारच्या वेळी ठंडाई केली जाते. दूध व इतर वस्तूंच्या मिश्रणापासून बनवलेली ठंडाई पिण्यासाठी इतर समाजाच्या मित्रांनाही निमंत्रित केले जाते. होळीच्या सणात पाचही दिवस रंगाची उधळण केली जाते. या वेळी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात येतो, परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाण्याबरोबरच रंगांच्या खर्चातही काटकसर होणार आहे.

दहशत मोडून काढली होती
पूर्वी सणांची परंपरा जोपासणे जिकिरीचे काम होते. हा भाग निझाम राजवटीच्या ताब्यात होता. या वेळी निझामाच्या हकसार संघटनेची असलेली दहशत मोडून राजपूत समाजाने होळी पेटवली होती. त्यावेळी हकसार संघटनेच्या व्यक्तींनी राजपूत समाजावर हल्ला केला. तेव्हापासून होळी उत्साहात साजरी करून शहिदांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो.’’
संतोषसिंह दिख्खत, किल्लेधारूर

कोरड्या रंगांचा प्रयत्न
गेल्या वर्षीपासून आम्ही पाण्याचा रंगासाठी कमी वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कोरड्या रंगांचा वापर करणार आहोत. सर्व बदल एकाएकी होणे शक्य नाही. पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. तरुणांनी याची दखल घ्यावी.’’
अजयसिंह दिख्खत (ठाकूर), किल्लेधारूर.