आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जमाफीसाठी शंभर शेतकऱ्यांनी भरून दिले तुरुंगात जाण्यासाठी इच्छापत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधी काळेगाव- सरसकट कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित कायदेशीर हमीभाव, शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक व सामाजिक संरक्षण अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या धोरणांमुळे जीवन जगणे अशक्य झाले अाहे. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असे इच्छापत्रच शंभर शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे भरून दिले आहे.   


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन किसान मंचची स्थापना केली आहे. त्याची धुरा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार या मंचच्या वतीने सविनय कायदेभंगाचे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात हे आंदोलन केले जाणार असून त्याची जिल्ह्यातील सुरुवात सोमवारी जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथून झाली आहे. यात या एकाच गावातून शंभर शेतकऱ्यांनी निवासी पजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे हे इच्छापत्र भरून दिले आहे. यात सरकारने ६ डिसेंबर २०१७ पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करावी अन्यथा ७ डिसेंबर रोजी इच्छापत्र भरून दिलेले सर्व शेतकरी शांततेच्या मार्गाने तुरुंगात जातील, असे किसान मंचने सांगितले आहे.

 

या अनोख्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा किसान मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून अर्जाची मागणी होत असून ते उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ होत असल्याचे मंचचे कार्यकर्ते विष्णुपंत गिराम यांनी “दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.   


किसान मंचच्या मागण्या : शेतकरी,शेतमजूर यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, ६ डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्चानुसार कायदेशीर हमीभाव देण्यात यावा,शेतकरी,शेतमजूर यांना कायद्याने आर्थिक व सामाजिक संरक्षण देण्यात यावे, पेरणी ते पीक कापणीपर्यंतचे प्रत्येक कामे मनरेगा अंतर्गत केली जावीत,शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे, शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये.   

 

असे असणार आंदोलन   

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. त्यासाठी सरकारला ६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही तर ७ डिसेंबर रोजी शेतकरी जवळच्या तुरुंगात जाणार आहेत. कोणताही शेतकरी कायदा हातात घेणार नाही असे किसान मंचाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत गिराम यांनी सांगितले.   

 

दररोज देणार इच्छापत्र   
जिल्ह्यातील प्रत्येक गावातून जवळपास तीनशे शेतकरी इच्छापत्र भरून देणार आहेत. बहुतांश गावांमध्ये इच्छापत्राचे अर्ज पाठवले आहेत. शेतकऱ्यांकडून जसे अर्ज येतील त्याप्रमाणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे दररोज येणारे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने किसान मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.   
सक्ती नाही   


सविनय कायदेभंगाचे हे     आंदोलन असल्याने कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज भरून देण्यासाठी सक्ती केली जात नाही. अर्जावर शेतकऱ्याचे नाव,गाव,मोबाइल क्रमांक आणि स्वाक्षरी अशी माहिती असणार आहे. अनेक गावांमध्ये शेतकरी गटा-गटाने एकत्र येऊन हे अर्ज भरून देत असल्याचे किसान मंचाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...