आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकाराने जमीन लिहून घेतली, तरुणाची आत्महत्या; अटकेसाठी नातेवाइक आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सावकाराने  कर्ज दिले, पण त्या बदल्यात जमीन नावे करून घेतली.  तरुणाने कर्जाची परतफेड करूनही सावकाराकडून आणखी पैशासाठी  तगादा सुरू झाला. याच त्रासाला कंटाळून शेवटी तरुणाने स्वत:च्या शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सोमवारी  सकाळी उघडकीस आली. नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आरटीई कार्यकर्ता आहे. त्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सावकारावर गुन्हा नोंद  करून त्याला अटक करावी नंतरच तरुणाचे शवविच्छेदन करू, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने  येथील जिल्हा रुग्णालयात आठ तास शवविच्छेदन राेखले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यांनतर  शवविच्छेदन करण्यात आले.   

 नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत ( ३८) यांनी बीड येथील  खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करूनही सावकारांकडून  आणखी पैशांसाठी तगादा सुरू होता. कर्जाच्या बदल्यात सावकाराने  राऊत यांची काही जमीनही  सावकाराने स्वत:च्या नावे  लिहून घेतली होती. सोमवारी सकाळी  राऊत  यांनी स्वत:च्या शेतात जाऊन  किटकनाशक प्राशन करून  आत्महत्या केली. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांचे वडील विक्रम राऊत  हे शेतात गेल्यावर हा प्रकार समोर आला.  ग्रामस्थांनी राऊत यांना बीडच्या खासगी रुग्णालयात दाखल  केले. तेव्हा डॉक्टरांनी  तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.  गावातील  रोजगार हमी योजनेतून झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार समोर  आणल्यामुळे  राऊत हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते.   

गुन्हा नोंदवा नंतरच  पीएम
राऊत यांच्या नातेवाइकांनीही संबंधित सावकारांवर  अाधी राऊत यांना आत्महत्येला प्रवृत्त  केले म्हणून  गुन्हा नोंदवावा, त्याला अटक  करावी, अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत अटक केली जाणार नाही  तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. आठ तास मृतदेह गाडीतूनही खाली  घेण्यात आला नव्हता.   
 
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
मयत वैभव राऊत यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पिंपळनेर ठाण्यात संतोष गायकवाड, अमोल गायकवाड, कुंडलीक खांडे, गणेश खांडे, हरिभाऊ खांडे, नामदेव खांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील कुंडलीक खांडे हे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...