आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉटरीपायी सुरू केल्या चोऱ्या, मोहसीन बनला अट्टल घरफोड्या; 2 लाख उधळले लॉटरीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरफोडी करणारा मोहसीन सय्यद - Divya Marathi
घरफोडी करणारा मोहसीन सय्यद

बीड- लहानपणापासून असलेल्या लॉटरी खेळण्याच्या छंदासाठी शाळकरी वयात असताना भुरट्या चोऱ्या करणारा मोहसीन सय्यद नंतर घरफोड्याही  करून लागला. सात घरफोड्यांमधील दोन लाखांची रोकड त्याने फक्त लॉटरीवर उधळली.अखेर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून साेने, चांदी असा १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बीड शहरात व नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या सात घरफोड्यांची त्याने कबुली दिली.   


मोहसीन जाफर सय्यद (रा. गांधीनगर) याला शाळकरी वयातच  लॉटरी खेळण्याची सवय लागली. पैसे असले की तो ते लॉटरीच्या तिकिटांवर किंवा इतर पद्धतीने चालणाऱ्या लॉटरीवर खर्च करायचा. मोहसीनचा हा छंद हळूहळू त्याचे व्यसनच बनला. तो नेहमीच लॉटरीवर पैसे खर्च करू लागला. पैशाची चणचण भागवण्यासाठी शाळकरी वयातच त्याने  भुरट्या चाेऱ्या सुरू केल्या. परंतु गेल्या काही दिवसांत त्याने आणखी पैशासाठी घरफोड्या करण्यास सुरुवात केली. आपल्या एका साथीदाराच्या मदतीने बीड शहर पाेलिस ठाणे, शिवाजीनगर पोलिस ठाणे व नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने सात घरफोड्या केल्या. यातील जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम त्याने लॉटरीवर उधळली. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहसीनला माेमीनपुरा भागातून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सातही घरफोड्यांची कबुली दिली.   

 

या टीमने केली कारवाई   
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, मुंजाबा कुव्हारे, राजभाऊ नागरगोजे, नसीर शेख, प्रसाद कदम, संतोष कातखडे, विष्णू चव्हाण यांनी कारवाई केली.   

 

 

पाळत ठेवून दिवसा घरफोडी   
एखाद्या बंद घरावर पाळत ठेवून मोहसीन आपल्या साथीदारासह दिवसाच घरफाेडी करायचा. कधी कुलूप तोडून, कधी खिडकी तोडून, तर कधी दरवाजा तोडून तो घरफोडी करायचा. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत शहरात दिवसा घरफोड्या वाढल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते.    

 

- मोहसीनकडून सात घरफोड्यांमधील ५८ ग्रॅम सोने, १५० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे.

- एक हजार  रुपयांची रोकडही मिळाली. मात्र घरफोडीतील सर्व पैसे त्याने सट्ट्यावर खर्च केले. त्याच्याकडून एकूण १ लाख ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

 

 

बातम्या आणखी आहेत...