आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thermal Power Stations, Latest News In Divya Marathi

परळीतील औष्णिक केंद्राची वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील चालू असलेल्या दोन संचांपैकी दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात शुक्रवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पाण्याअभावी बंद पडला. चालू असलेला संच क्रमांक सहा रात्रीत बंद पडणार असल्याने दीड वर्षात दुस-यांदा येथील वीजनिर्मिती पूर्णत: बंद पडली आहे. परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचे तीन व दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेचे दोन संच आहेत. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन बिघाड असल्याने वर्षभरापासून बंद आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार दीड महिन्यापासून कोळशाअभावी बंद आहे. तेवढ्याच क्षमतेचा संच क्रमांक पाच खडका बंधा-यातील पाणी संपल्याने तीन दिवसांपूर्वी बंद करावा लागला. बंधा-यात वेगवेगळ्या ठिकाणी साठलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने एकत्र करून 250 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक सहा व सात चालवण्यात येत होते.
दोन दिवसांत पाऊस पडेल या आशेवर दोन संच चालवण्यात येत होते. पाऊस पडलाच नाही, खडका बंधा-याने तळ गाठल्याने दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात शुक्रवारी सकाळी बंद करावा लागला. चालू असलेला दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा रात्रीतून बंद पडणार आहे. पाण्याअभावी गेल्या दोन वर्षांत परळी येथील संपूर्ण वीजनिर्मिती दुस-यांदा बंद पडत आहे.