आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३४ लाखांची लूट करून गोळीबार करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत आणण्यात आलेली ३४ लाख रुपयांची रोकड बँक कर्मचाऱ्यांना चाकूने भोसकून पाच दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास पळवली. त्यानंतर सेनगाव-रिसोडच्या सीमेवर पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये सिनेस्टाइल गोळीबार होऊन रक्कम, दरोडेखोर आणि त्यांची जीप पोलिसांनी ताब्यात घेऊन अवघ्या दोन तासांत कारवाई केली.

सेनगाव येथील आजेगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ हैदराबादेत हिंगोलीवरून खासगी वाहनाने रोकड येणार असल्याची माहिती दरोडेखोरांना मिळाली. नेमक्या कोणत्या वाहनातून रक्कम येणार याची खबर न मिळाल्याने दरोडेखोरांनी बँकेसमोर रोकड आणणारे वाहन येताच लुटण्याचा निर्णय घेतला. दुपारी १२ च्या सुमारास रोकड आणणारी इंडिका कार (एमएच ३८ ६०४५) बँकेसमोर उभी राहिली. कॅशियर अश्विनी जायभाये आणि शिपाई गणेश चंदेल हे रोकड घेऊन जीपमधून खाली उतरताच सहा दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवत रकमेची थैली हिसकावून घेतली. शिपाई चंदेल याने प्रतिकार करताच एका दरोडेखोराने शिपायाला चाकूने भोसकले. यात चंदेल याच्या हातावर गंभीर वार झाले. त्यानंतर दरोडेखोर आणलेल्या सुमो या वाहनाने (एमएच ३८ २३७) गोरेगावच्या दिशेने पसार झाले.
सेनगाव पोलिसांना माहिती मिळताच पीआय सुनील रसाळ यांनी वरिष्ठांना माहिती देत पीएसआय राजू मोरे, महिला फौजदार ए. पी. विरणकर व पोलिस कर्मचारी घेऊन दरोडेखोरांच्या शोधार्थ निघाले. गोरेगाव व रिसोड पोलिसांना नाकाबंदी करण्याचे अगोदरच सूचित करण्यात आल्याने बंदोबस्त लावण्यात आला. दरोडेखोर म्हाळशीमार्गे जात असल्याचे समजताच पोलिसांनी शेगाव खोडके येथील नागरिकांना मोबाइल फोनवरून टाटा सुमो जीप अडवण्याच्या सूचना केल्या. दीडच्या सुमारास दरोडेखोरांच्या जीपला सेनगाव तालुक्यातील व रिसोडच्या सीमेवरील शेगाव खोडके या गावाजवळील पुलाजवळ ग्रामस्थांनी थोपवले. त्यामुळे रोकडसह दरोडेखोर शेतातून पळत सुटले. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर काही वेळातच त्यांनी रोकडची थैली फेकून देत पळ काढला; परंतु पोलिसांनी पुन्हा पाठलाग केला. दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या पोलिस कर्मचारी खंडेराव नरोटे आणि संजोग वाघमारे यांच्या कानाजवळून गेल्या. त्यानंतर पोलिसांनी निर्वाणीचा इशारा देत, दरोडेखोरांना शरण येण्यास सांगितले. परंतु दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून जनार्दन रामराव वाघमारे (३५, रा. भांडेगाव, ता. हिंगोली), राजेंद्रसिंह महेपालसिंह बावरी (२५ रा. बडनेरा, जि. अमरावती), बादशाहसिंह अजबसिंह टाक (३०, रा. वडाळी, जि. अमरावती) यांना ताब्यात घेतले. तर अन्य तिघे पसार झाले. पोलिसांनी रोख रक्कम ३४ लाख आणि वाहन असा ३९ लाखांचा ऐवज आणि एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे, दोन फूट लांबीचे तीन खंजीर जप्त केले.
पोलिस अधीक्षक एसपी मोराळे आणि अपर पोलिस अधीक्षक गुंजाळ यांनी दरोड्यासंबंधी माहिती दिली. या वेळी जप्त केलेली रक्कम व समोर दरोडेखोर. छाया: सुधाकर वाढवे
बातम्या आणखी आहेत...